कोरोना रुग्णसंख्येत ठाणे जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:36 AM2021-03-14T04:36:09+5:302021-03-14T04:36:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या जागतिक संकटातून काही अंशी सावरत असतानाच ऐन वर्षाच्या टप्प्यात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या जागतिक संकटातून काही अंशी सावरत असतानाच ऐन वर्षाच्या टप्प्यात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येत देशातील आठ जिल्हे आघाडीवर असून राज्यातील या आठ जिल्ह्यांमध्ये देशात ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पुणे आणि नागपूर अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकावर आहे. मुंबईला मागे टाकत ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे प्रशासकीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.
ठाणे जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याच्या वृत्तास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दुजोरा दिला आहे. तब्बल दहा हजार रुग्ण सध्या जिल्ह्यात उपचार घेत आहेत. यामध्ये समाधानाची बाब म्हणजे जिल्ह्यातील मृत्यूदर कमी असला तरी वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे. यासाठी शुक्रवारी उशिरापर्यंत आरोग्य उप संचालकांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आरोग्य यंत्रणेने कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यासह आरोग्याच्या दृष्टीने विविध उपाय योजनावर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचेही डॉ. रेंघे यांनी लोकमतला सांगितले.
जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णवाढीचे प्रमाण कल्याण डोंबिवली महापालिका पाठोपाठ ठाणे महापालिका परिसरात आहे. यानंतर नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर परिसरात रुग्णसंख्या वाढताना आढळून येत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात आढळलेले १ हजार १५३ रुग्णसंख्या ही या वर्षातील सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदली गेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ७४ हजार २८३ रुग्णसंख्या आढळलेली आहे. त्यापैकी २ लाख ५९ हजार ३६० रुग्ण बरे झाले आहेत. तर मृत्यू ६ हजार ३२६ झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. या वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा, पोलीस आणि जिल्ह्यातील महापालिका प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे लक्ष केंद्रित केले आहे.
.......
जिल्ह्यातील लसीकरण -
जिल्ह्यातील लसीकरण केंद्र- ८५२
* जिल्ह्यात रोजचे अपेक्षित लसीकरण - २०८०
* आतापर्यंत पहिला डोस - १५१५७३
* दुसरा डोस - ३०२४२
* ४५ वर्षे ते ज्येष्ठ नागरिकांचे डोस - २६५
.........