CoronaVirus News : कोरोनाच्या बी ए ४ व ५ उपप्रकारच्या रूग्णसंख्येत ठाणे जिल्हा राज्यात तृतीय क्रमांकावर
By सुरेश लोखंडे | Published: August 23, 2022 06:13 PM2022-08-23T18:13:07+5:302022-08-23T18:19:58+5:30
कोरोना आणि त्याच्या बीए४, बीए ५ या कोरोना उपप्रकाराच्या साथीच्या आजारानेही डोके वर काढले आहे.
ठाणे - कोरोना या जीवघेण्या आजाराच्या विषाणूचे जनुकीय क्रम निर्धारण सर्वेक्षण राज्यभरातील सात प्रयोगशाळांकडून केले जात आहे. या सर्वेक्षणाच्या १० ते १९ ऑगस्ट या कालावधीच्या अहवालामध्ये कोरोनाच्या बी ए ४, बी ए ५ या उपप्रकाराचे १६ रूग्ण ठाणे जिल्ह्यात आढळून आले आहेत. कोरोनाच्या या उपप्रकारामधील राज्यभरात ही तृतीय क्रमांकाची रूग्ण संख्या असल्याची नोंद सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमात नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सध्या स्वाईन फ्यू या साथीच्या आजारासह डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या आजारांचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या पाठोपाठ कोरोना आणि त्याच्या बीए४, बीए ५ या कोरोना उपप्रकाराच्या साथीच्या आजारानेही डोके वर काढले आहे. या कोरोनाच्या उपप्रकाराचे रूग्ण पुण्यात २३५, मुंबईला ७२ आणि तृतिय क्रमांकाचे १६ रूग्ण ठाणे जिल्ह्यात आढळून आले आहेत. कोरोना विषाणूच्या जनुकीय क्रम निर्धारण सर्वेक्षण अहवालाव्दारे ही रूग्ण संख्या निश्चत करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याातील साथीच्या आजारांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
ठाणे जिल्ह्यात बीए २.७५ चा रूग्ण नाही
जनुकीय क्रम निर्धारण सर्वेक्षणाच्या अहवालानुसार कोरोनाच्या बी ए २.७५ या उपप्रकाराच्या रूग्णांचे प्रमाण राज्यात वाढताना दिसून येत आहे. मात्र ठाणे जिल्ह्यात या उपप्रकारचा रूग्ण नसल्याचे नमुद करण्यात आले आहे. राज्यात पूर्वी सर्वाधिक बी ए २.३८ या उपप्रकारचे रूग्ण आढळून येत असे. पण आता बी ए २.७५ चे रूग्ण संख्या राज्यात ४५९ आहे. मात्र ठाणे जिल्ह्यात या रूग्णाचा अजून शिडकाव झालेला नसल्याची समाधानाची बाब आहे. पुण्यात २३४ तर मुंबईला १३१ रूग्ण बी ए २.७५चे आहे.