यंत्राद्वारे भात लागवडीसाठी ठाणे जिल्हा सज्ज
By admin | Published: June 8, 2015 04:44 AM2015-06-08T04:44:18+5:302015-06-08T04:44:18+5:30
यांत्रिक शेतीच्या युगात आता ही भात लागवड ‘भातरोवणी यंत्रा’द्वारे करण्याचे निश्चित केले आहे. राज्यात प्रथमच कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात हा उपक्रम राबवला जाणार आहे.
सुरेश लोखंडे, ठाणे
भात हे खरीप हंगामातील कोकण विभागाचे प्रमुख पीक आहे. खाचरातील चिखलात पारंपारिक पद्धतीने भातपिकाचे रोपण मजुरांकडून केले जाते. पण, यांत्रिक शेतीच्या युगात आता ही भात लागवड ‘भातरोवणी यंत्रा’द्वारे करण्याचे निश्चित केले आहे. राज्यात प्रथमच कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात या खरीप हंगामात पहिल्यांदा यंत्राद्वारे भाताची लागवड केली जाणार आहे. यासाठी शहापूर व भिवंडी तालुक्यांची प्राधान्यक्रमाने निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील या दोन तालुक्यांत प्रायोगिक तत्त्वावर भातरोवणी यंत्राद्वारे लागवड केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाखाली १० यंत्रांची खरेदी करण्यात आली आहे. एका यंत्राच्या खरेदीसाठी सुमारे साडेतीन लाख रुपये किंमत मोजावी लागली आहे. यानुसार, सुमारे ३५ लाख रुपये किमतीच्या या यंत्रांच्या खरेदीसाठी जिल्हा परिषदेची मदत घेतल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी महावीर जंगटे यांनी लोकमतला सांगितले.
मजुरांऐवजी ‘भातरोवणी’ यंत्राद्वारे या वर्षापासून भात लागवडीला प्रारंभ होणार आहे. याआधी केवळ आंध्र प्रदेश व केरळ राज्यांत या यंत्राद्वारे लागवड केली जात असे. पण, आता राज्यात प्रथमच ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बचत गटांना ९० टक्के अनुदानावर या यंत्रांची खरेदी करून दिली आहे.