ठाणे जिल्ह्याला मिळाल्या ८५ हजार लसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:38 AM2021-04-13T04:38:20+5:302021-04-13T04:38:20+5:30
ठाणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात लसींचा साठा अपुरा पडू लागला होता. ठाण्यात तर वीकेंड ...
ठाणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात लसींचा साठा अपुरा पडू लागला होता. ठाण्यात तर वीकेंड लॉकडाऊनचे कारण देऊन दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानंतर आता जिल्ह्याला ८५ हजार लसींचा साठा मिळाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा लसीकरण उत्सव केवळ दोन दिवसच चालेल, अशी शक्यता आहे. तर सोमवारी सांयकाळी किंवा मंगळवारी सकाळपर्यंत आणखी ८१ हजार लसींचा साठा मिळणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
ठाणे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून लसींअभावी लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते, तर लसींचा साठा अपुरा असल्याने वीकेंड लॉकडाऊनचे कारण देऊन ठाण्यासह अनेक ठिकाणी लसीकरण दोन दिवस बंद ठेवले होते. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार लसींचा उत्सव कसा साजरा करायचा असा पेच जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांपुढे निर्माण झाला होता. परंतु, आता जिल्ह्यासाठी सोमवारी सकाळी ८५ हजार लसींचा साठा उपलब्ध झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यानुसार त्याचे वाटपही झाले आहे. या सर्व लसी कोविशिल्डच्या असल्याचेही सांगण्यात आले. परंतु, उपलब्ध झालेला साठा वितरित केल्यानंतर प्रत्येक महापालिकेच्या वाटेला दीड हजार ते २० हजारपर्यंत साठा मिळाला आहे. त्यामुळे तो किती दिवस पुरणार, असा प्रश्न महापालिकांना पडला आहे.
पुढील दोन दिवस पुरेल एवढा हा साठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु त्यानंतर काय करायचे असा पेच आहेच. त्यामुळे लसीकरणाचा उत्सव कसा साजरा करायचा? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. दुसरीकडे सोमवारी सांयकाळी किंवा मंगळवार सकाळपर्यंत आणखी ८१ हजार लसींचा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तो वेळेत आला तरच हा उत्सव साजरा होऊ शकणार आहे. आलेल्या साठ्याचे वाटप दिवसभर सुरू होते. त्यामुळे अनेक ठिकाणी रोजच्या रोज सुरू असलेल्या केंद्रापैकी अनेक केंद्र सोमवारीदेखील बंदच असल्याचे दिसून आले. परंतु, मंगळवारी सर्व केंद्रावर लसीकरण पुन्हा सुरू होईल, असा दावा महापालिकांनी केला आहे.
महापालिका - मिळालेला लसींचा साठा
ठाणे - १५,०००
नवीमुंबई - २०,०००
कल्याण डोंबिवली - १२,०००
उल्हासनगर - १५००
भिवंडी - १५००
मीरा-भाईंदर - १५,०००
ठाणे ग्रामीण - २०,०००
--------------
एकूण - ८५०००