ठाणे जि. प.च्या बोलक्या - रंगीत सजावटीच्या स्मार्ट अंगणवाड्यांना आता मिळणार सोई - सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 03:46 PM2019-01-10T15:46:20+5:302019-01-10T15:52:52+5:30
या स्मार्ट अंगणवाड्यांसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग आणि लायन्स क्लब जुहू च्यावतीने ‘स्मार्ट अंगणवाडी योजना’ हाती घेतली आहे. या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात तब्बल ७० स्मार्ट अंगणवाड्यांना स्मार्टरूप दिले जाणार असल्याची माहिती महिला व बाल कल्याण अधिकारी संतोष भोसले यांनी दिली.
ठाणे : रंग रंगोटीच्या बोलक्या भींती, त्यावरील अंतर्गत सजावटी, पाण्यासह आसन व्यवस्था आदी दर्जेदार भौतिक सुविधा, मुलांच्या खेळण्यासाठी विस्तीर्ण मैदान, खेळांचे विविध साहित्य आदी पुरेपूर सोयी सुविधा असलेल्या स्मार्ट अंगणवाड्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उभ्या राहत आहेत. त्यास अनुसरून वडवली, राहुर आणि बोरिवली या भिवंडी तालुक्यामधील गावांतील तीन अंगणवाड्यांचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती दर्शना ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्मार्ट अंगणवाड्यांसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग आणि लायन्स क्लब जुहू च्यावतीने ‘स्मार्ट अंगणवाडी योजना’ हाती घेतली आहे. या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात तब्बल ७० स्मार्ट अंगणवाड्यांना स्मार्टरूप दिले जाणार असल्याची माहिती महिला व बाल कल्याण अधिकारी संतोष भोसले यांनी दिली. यावेळी भिवंडी पंचायत समिती उपसभापती वृषाली विशे, जिल्हा परिषद सदस्य वैशाली चंदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी आस्मा अत्तार, लायन्स क्लबचे दिपक चौधरी, आयन अजित जैन आदींच्या उपस्थितीत या स्मार्ट अंगणवाडी योजनेचा शुभारंभ थाटात पार पडला.
अंगणवाडी हे ग्रामस्तरावरावरील समाज विकासाचे प्रभावी केंद्र बनू शकते. अंगणवाड्यांना भौतिक दृष्ट्या अद्यावत केल्याने शैक्षणिक वातावरण निर्मिती, बालकांचा सर्वांगीण विकासा करीता विविध उपक्र मा, महिला, बालके, किशोरीना विविध सेवा या स्मार्ट अंगणवाडी योजनेव्दारे दिल्या जाणार आहेत. सुविधांनी सज्ज होणाऱ्या या स्मार्ट अंगणवाडी केंद्रासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून अंगणवाड्यांध्ये वॉटर प्युरीफायर, सिलींग फॅन, धान्य कोठी, कारपेट, ग्रीन बोर्ड, घसरगुंडी, डुलता घोडा इत्यादी वस्तूंची तरतूद करण्यात आली आहे. तर लायन्स क्लबमार्फत अंगणवाडी अंतर्गत व बाह्य रंगकाम, बोलक्या भिंती, छत दुरूस्ती, भिंतीची दुरूस्ती व डागडूजी, किचन प्लॅटफॉर्म, दरवाजा व खिडक्या दुरूस्ती, आतील भिंतीवर एक फुट उंचीची लादी, लायब्ररी रॅक आदी सुविधा देण्यात येणार आहेत. या कामां करीता साधारण एका अंगणवाडीसाठी सुमारे एक लाख खर्च येणार आहे. अशा सुमारे ७० अंगणवाड्यांसाठी ७० लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
-------------