ठाणे जिल्हा पुरवठा कर्मचारी मंगळवापासून बेमुदत कामबंद आंदोलनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 07:20 PM2017-10-02T19:20:33+5:302017-10-02T19:20:40+5:30
विविध स्वरूपाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हास्तरीय पुरवठा विभागाचे कर्मचारी कामबंद आंदोलनास ३ आॅक्टोबरपासून सुरुवात करणार आहेत.
ठाणे : विविध स्वरूपाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हास्तरीय पुरवठा विभागाचे कर्मचारी कामबंद आंदोलनास ३ आॅक्टोबरपासून सुरुवात करणार आहेत. बेमुदत असलेल्या या आंदोलनादरम्यान कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. मात्र ते कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही.
राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेच्या नियंत्रणात जिल्ह्यातील सुमारे २०० कर्मचारी यात सहभागी होणार आहेत. जिल्हा पुरवठा विभागासह तहसीलदारांच्या नियंत्रणातील पुरवठा कर्मचारी देखील या संपात सहभागी होणार आहेत. बेमुदत कामबंद आंदोलन हे पुरवठा कर्मचा-यांचे राज्यस्तरीय आंदोलन आहे. त्यात या कर्मचा-यांनी सहभाग घेतला आहे. या आंदोलनापाठोपाठ १० आॅक्टोबरपासून महसूल कर्मचारी देखील त्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन छेडणार आहे. राज्यभर होणा-या या आंदोलनादरम्यान कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहून ही काम करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही कर्मचा-यांच्या मागण्यांवर अद्यापही विचार केला नाही. यामुळे संतापलेल्या कर्मचा-यांनी या बेमुदत व असहकार आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय उपाध्यक्ष भास्कर गव्हाळे यांनी सांगितले.