जुन्या पेन्शनच्या आक्रोश मोर्चासाठी ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांची जुळवाजुळव
By सुरेश लोखंडे | Published: December 7, 2023 06:45 PM2023-12-07T18:45:18+5:302023-12-07T18:45:36+5:30
आजपासून नागपूरला दिवाळी अधिवेशन सुरू झालेले आहे.
ठाणे: जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसह प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वाखाली शिक्षकांकडून राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी नागपूरला जाण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांकडून जुळवाजुळव सुरू करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना या आक्रोश मोर्चात सहभागी होणार आहेत,असे या संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी विनोद लुटे यांनी स्पष्ट केले.
आजपासून नागपूरला दिवाळी अधिवेशन सुरू झालेले आहे. या अधिवेशनास अनुसरून जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा हा आक्रोश मोर्चा थेट नागपूर अधिवेशनाला धडकणार आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसह आता शिक्षकांकडून गावात निवास स्थान उपलब्ध करून देईपर्यंत मुख्यालय राहण्याची शिक्षकांना सक्ती करू नये या मागणीसह शाळा योजना रद्द करावी,शाळा समूह योजना मागे घ्यावी,शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित हप्त्याचे प्रदान करावे, एनजीओ च्या नावाखाली शाळांमधील उपक्रमांचा भार कमी करावा, नव साक्षरता अभियानांतर्गत सर्वेक्षण चे काम शाळांना देऊ नयेत, जिल्हा परिषद शाळेतील दारिद्र्यरेषेखालील मुलींचा उपस्थिती भत्त्यात वाढ करावी आदी प्रमुख मागण्या या मोर्चात ठेवण्यात आल्या आहेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे चिटणीस किशोर पाटील, ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी विनोद लुटे यांनी स्पष्ट केले.