ठाणे जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात ६६ उमेदवार निवडणूक रिंगणात- दुरंगी लढतीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 06:40 PM2019-04-12T18:40:43+5:302019-04-12T18:51:55+5:30
जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी ८७ उमेदवारांनी ११४ नामनिर्देशनपत्र (अर्ज) दाखल केले होते. छाननीमध्ये १२ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. शिल्लक राहिलेल्या ७५ उमेदवारांपैकी नऊ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी शुक्रवारी मागे घेतली. यामुळे आता ६६ उमेदवार जिल्ह्यातील निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत.
ठाणे : जिल्ह्यातील लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघातून नऊ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी आज मागे घेतली आहे. यामुळे या तिन्ही मतदारसंघात आता केवळ ६६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ठिकठिकाणच्या बंडखोर उमेदवारांनी देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता या तिन्ही मतदारसंघांमधील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमधील दुरंगी लढतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी ८७ उमेदवारांनी ११४ नामनिर्देशनपत्र (अर्ज) दाखल केले होते. छाननीमध्ये १२ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. शिल्लक राहिलेल्या ७५ उमेदवारांपैकी नऊ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी शुक्रवारी मागे घेतली. यामुळे आता ६६ उमेदवार जिल्ह्यातील निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. या उमेदवारांना होणा-या मतदानासाठी ठाणे व कल्याण मतदारसंघामधील मतदार केंद्रांवर दोन बॅलेड युनिट म्हणजे मतदानयंत्र लागणार आहेत. तर भिवंडीच्या मतदान केंद्रांमध्ये केवळ एक मतदान यंत्र उपलब्ध करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे मतदार संघात आता २५ पैकी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दोघांनी उमेदवारी मागे घेतली. यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये आता दुरंगी लढत होणार आहे. या दोन प्रमुख उमेदवारांसह या मतदारसंघात आता नोंदणीकृत अमान्य पक्षांच्या १३ उमेदवारांसह दहा अपक्ष उमेदवार ठाणे मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात ३६ उमेदवार होते. यातून चार अवैध ठरले होते. शिल्लक राहिलेल्या ३२ उमेदवारांपैकी चार जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामतदार संघातही शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांमध्ये लढत होईल. भिवंडी मतदार संघात तिरंगी लढत होणार होती. पण शिवसेनेच्या व काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराने देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळे या मतदार संघात आता भाजपा व काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये दुरंगी लढतीचा मार्ग मोकळा झाला. भिवंडीत शिल्लक राहिलेल्या १८ उमेदवारांपैकी तीन जणांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे या मतदारसंघात आता १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.