ठाणे जिल्ह्याला जलमार्गाची प्रतीक्षा!, नव्या वर्षात तीन हजार २५३ कोटींचे प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 06:26 AM2018-01-02T06:26:26+5:302018-01-02T06:26:35+5:30
मुंबई महानगरानंतर आता ठाणे जिल्ह्यात झपाट्याने नागरिकीकरण वाढत आहे. स्मार्ट सिटीचे वेध लागल्यामुळे दळणवळणात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा ताण महामार्गांसह लोहमार्गांवर मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यातून होणा-या वाहतूककोंडीला जलमार्गाचा पर्याय उत्तम असल्याचे जाणकारांचे मत आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे - मुंबई महानगरानंतर आता ठाणे जिल्ह्यात झपाट्याने नागरिकीकरण वाढत आहे. स्मार्ट सिटीचे वेध लागल्यामुळे दळणवळणात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा ताण महामार्गांसह लोहमार्गांवर मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यातून होणा-या वाहतूककोंडीला जलमार्गाचा पर्याय उत्तम असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे नवीन वर्षात सुमारे तीन हजार २५३ कोटींचे जिल्ह्यातील सहा जलमार्ग पूर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नाताळ सुटीच्या निमित्ताने गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील बहुतांश महामार्गांवर नागरिकांना वाहतूककोंडीशी लढावे लागले. त्यात घरी जाणाºया चाकरमान्यांनादेखील वेळेत घर गाठणे कठीण झाले. यातून मार्ग काढण्यासाठी ठाणे महापालिकेच्या चार जलमार्गांसह नवी मुंबई महापालिका-एमएमआरडीएचे दोन जलमार्ग मार्गी लावण्याचा प्रशासनाचा संकल्प लोकहिताचा ठरणार आहे.
केंद्र शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या फिफटीफिफटीच्या खर्चातून जलमार्गांना मुहूर्तरूप प्राप्त होईल. लोकप्रतिनिधींद्वारे त्यावर तात्पुरती चर्चा होते, प्रसिद्धी मिळते; पण संबंधित प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित केल्यास जलमार्ग मार्गी लागणे शक्य आहे. त्यासाठीचा आवश्यक त्या तयारीचा आढावा केंद्र शासन पुरस्कृत दिशा समितीच्या बैठकीत होणे अपेक्षित आहे. यामुळे केंद्राचा ५० टक्के निधी या बैठकीद्वारे सहज मिळणे शक्य आहे.
नवी मुंबई परिसरातील खाडीत सुरू होणारी जलवाहतूक जिल्ह्यात सर्वाधिक खर्चाची आहे. यामध्ये वाशी ते ठाणे आणि पामबीच मार्गाला समांतर वाशी ते बेलापूर जलमार्गाचा समावेश आहे. यातील पहिल्या टप्प्यातील वाशी ते ऐरोलीदरम्यानचा १२ किमी लांबीच्या जलमार्गास एमएमआरडीएनेदेखील सहमती दर्शवली आहे. त्यासाठी सुमारे दोन हजार ८०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
वाशीगाव येथून खाडीकिनाºयावरून कोपरखैरणे- घणसोली-गोठिवली-रबाळे-ऐरोली व दिघा हा जलमार्ग उपनगरांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएने पहिल्या टप्प्यातील वाशी ते ऐरोलीदरम्यानच्या जलमार्गास अनुकूलताही दर्शवली आहे. यानंतर, वाशी ते बेलापूरदरम्यानचा मार्गही त्वरित हाती घेण्याची गरज आमदार संदीप नाईक यांनी दिशाच्या बैठकीत व्यक्त केली आहे.
ठाणे महापालिकेच्या चार जलमार्गांसाठी ४५३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात सुमारे २८७ कोटी ठाणे महापालिकेला खर्च करणे अपेक्षित आहे. उर्वरित सुमारे १६६ कोटींचा खर्च केंद्र शासनाकडून मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय ठाणे ते वसई, मीरा-भार्इंदर जलमार्ग, ठाणे ते भिवंडी, ठाणे ते डोंबिवली, कल्याण आदी चार जलमार्ग ठाणे मनपाने गांभीर्याने पूर्ण करण्याची अपेक्षा ठाणेकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यास मुंबई-अहमदाबाद, आग्रा, बंगळुरू व गोवा आदी चार राष्टÑीय राजमहामार्गांनी वेढले आहे. त्यावरील अत्यल्प कमी किलोमीटरच्या अंतरावरील १५ टोलनाके अधूनमधून डोके वर काढतातच. यामुळे सामान्य नागरिक आर्थिक विवंचनेसह वाहतूककोंडीच्या चक्र व्यूहात अडकलेल्यांना जलमार्गाचा पर्याय सर्वोत्तम आहे. यातून ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषणावरही मात करून पर्यावरण संतुलन राखता येणार असल्याचे बोलले जाते.
चार जलमार्गांसाठी ४५३ कोटी अपेक्षित
ठाणे महापालिकेच्या चार जलमार्गांसाठी ४५३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात सुमारे २८७ कोटी ठाणे महापालिकेला खर्च करणे अपेक्षित आहे. उर्वरित सुमारे १६६ कोटींचा खर्च केंद्र शासनाकडून मिळण्याची अपेक्षा आहे. यानुसार, प्रशासनाने तयारी दाखवली, मात्र प्रत्यक्षात कागदावरील जलमार्गाचे काम खाडीपात्रात दिसणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये इंद्रासिटी रूट ते घोडबंदर रोड, कोलशेत, साकेत, दिवा हा जलमार्ग आहे.