ठाणे जिल्ह्यात चार तालुके वाढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 06:29 AM2017-08-07T06:29:19+5:302017-08-07T06:29:19+5:30
जिल्ह्याचे विभाजन होऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यापाठोपाठ आता डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी पूर्व या चार नवीन तालुक्यांची लवकरच निर्मित होणार आहे. त्यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत.
सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्याचे विभाजन होऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यापाठोपाठ आता डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी पूर्व या चार नवीन तालुक्यांची लवकरच निर्मित होणार आहे. त्यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत.
ठाण्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यामुळे ठाणे जिल्ह्यात सात तालुके शिल्लक आहेत. त्यात आता या चार तालुक्यांची भर पडून ते ११ होणार आहेत. महसूलच्या विविध कामांसाठी नागरिकांची होत असलेली फरफट, वाढती लोकसंख्या आणि त्याचा प्रशासनावर पडत असलेला ताण आदी समस्या कमी होण्याची शक्यता आहे. या पावसाळी अधिवेशनानंतर चारही तालुक्यांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ठाणे तालुक्याचे विभाजन होऊन नवी मुंबईला तालुक्याचा दर्जा मिळेल. ठाण्यात समाविष्ट असलेल्या मीरा-भार्इंदरलादेखील तालुक्याचा दर्जा देऊन मीरा रोड येथे तहसीलदार कार्यालय उभारले जाणार आहे. कल्याण तालुक्याचे विभाजन होऊन डोंबिवली, तर भिवंडी तालुक्यातून भिवंडी पूर्व तालुक्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे.
प्रत्येक तालुक्यासाठी तहसीलदार व अतिरिक्त तहसीलदार असे दोन अधिकारी असणार आहेत. त्यांच्या कार्यालयांसाठी लागणाºया अन्य कर्मचारी वर्गाचेदेखील नियोजन जवळजवळ निश्चित झाले आहे. या चार शहरी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महसूल असल्यामुळे त्यांची वसुली या स्वतंत्र तहसीलदार कार्यालयांकडून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवी मुंबईतून वगळलेली १४ गावे सध्या कल्याण तालुक्यात आहेत. ती ठाणे तालुक्यात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. डोंबिवली या शहरी तालुक्यासदेखील २७ गावांमधील काही गावे जोडण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. यासह ठाण्याची २२ गावे मिळून होणाºया ६३ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेला खीळ बसणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
भिवंडी गोदामांचा ग्रामीण तालुका कायम
भिवंडी तालुक्यातील ६० ग्रामपंचायत क्षेत्रात २५ हजार गोदामे आहेत. त्याचा ग्रामीण तालुका कायम राहणार आहे. नव्याने निर्माण होणाºया शहरी तालुक्यात भिवंडी-निजामपूर मनपा क्षेत्र १३ गावे, एमएमआरडीए क्षेत्रातील ५१ गावांमधील काही भागांचा समावेश करण्याची शक्यता आहे.
मीरा-भार्इंदरच्या शेतकºयांना सुमारे ३० किमी अंतर कापून ठाणे गाठावे लागते. या शहरात उत्तन परिसर पर्यटन क्षेत्र आहे.