ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९.२८ टक्के ; अनेक वर्षातील सर्वोच्च निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:30 AM2021-07-17T04:30:08+5:302021-07-17T04:30:08+5:30
ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार केलेल्या दहावी ...
ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार केलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात ठाणे जिल्ह्याचा ९९.२८ टक्के निकाल लागला आहे. तो मागील अनेक वर्षातील सर्वोच्च निकाल असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी लतिका कानडे यांनी लोकमतला सांगितले.
ठाणे जिल्ह्यात एक लाख २४ हजार ९१ विद्यार्थी परीक्षार्थी होते. त्यापैकी एक लाख २३ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी ६६ हजार ८४५ मुले तर ५७ हजार २४६ मुली प्रविष्ट होत्या. जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे मनपा, नवी मुंबई मनपा, मीरा-भाईंदर मनपा, कल्याण-डोंबिवली मनपा, उल्हासनगर मनपा, भिवंडी मनपा आदी क्षेत्रातील विद्यार्थी परीक्षार्थी होते. यामध्ये मीरा भाईंदर मनपा क्षेत्रातील ९९.७१ टक्के विद्यार्थी सर्वाधिक उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
----
मागील दहा वर्षांतील आकडेवारी खालीलप्रमाणे
२०११ - ८८.३९
२०१२ - ८८.८७
२०१३- ८८.९०
२०१४- ८९.७५
२०१५- ९१.१५
२०१६ - ९१.४२
२०१७. - ९०.५९
२०१८. - ९०.५१
२०१९. - ७८.५५
२०२०. - ९६.६१
२०२१-९९.२८