ठाणे विभागाला बाप्पा पावला, गणेशोत्सवात एसटीच्या तिजोरीत दीड कोटी जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:13 AM2017-09-09T03:13:33+5:302017-09-09T03:13:50+5:30
ना नफा ना तोटा, या तत्त्वावर चाकरमान्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागामार्फत यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी जादा सोडलेल्या एसटीमुळे परिवहन विभागाच्या तिजोरीत सुमारे दीड कोटीची रक्कम जमा झाली.
पंकज रोडेकर
ठाणे : ना नफा ना तोटा, या तत्त्वावर चाकरमान्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागामार्फत यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी जादा सोडलेल्या एसटीमुळे परिवहन विभागाच्या तिजोरीत सुमारे दीड कोटीची रक्कम जमा झाली. त्यामुळे यंदा ठाणे विभागीय कार्यालयाला ‘बाप्पा पावला’ असेच म्हणावे लागणार आहे. या वर्षी कोकणात जादा बसच्या वाढलेल्या संख्येबरोबर प्रवासी आणि तिजोरीत जमा झालेल्या रकमेतही वाढ झाल्याने लाल डबा गणेशोत्सवात नागरिकांच्या पसंतीस पडल्याचे दिसत आहे.
गणेशोत्सव म्हणजे चाकरमान्यांसाठी जणू एक पर्वणीच असते. त्यामुळे कोकणात बाप्पाच्या आगमनासाठी जाणाºया चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात घेऊन या वर्षी महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील ठाणे १-२, कल्याण, विठ्ठलवाडी, मुलुंड, भांडुप, बोरिवली, भार्इंदर या ८ डेपोंतून २० ते २४ आॅगस्टदरम्यान ८११ एसटीच्या जादा फेºयांचे नियोजन केले होते. या जादा गाड्यांचे आरक्षण संगणकीय आरक्षण पद्धतीने उपलब्ध करून दिले आहे. हे आरक्षण एक महिना अगोदरपासून तसेच ग्रुप पद्धतीचे आरक्षण ४० दिवस आधीपासूनच उपलब्ध करून दिले होते. तसेच ऐन वेळी मागणी वाढल्यास फेºया वाढवण्यात येणार असल्याचे एसटी विभागाने सांगितले होते.
गणेश चतुर्थीसाठी यंदा कोकणात ८३७ एसटीच्या जादा फेºया रवाना झाल्या. या फेºयांद्वारे २ लाख ९४ हजार किलो मीटर इतके अंतर या बसेस धावल्या असून त्यातून ठाणे विभागाच्या तिजोरीत १ कोटी ४८ लाख १६ हजारांची रक्कम जमा झाली आहे.