ठाण्यातील प्रभाग समितीला आंबटशौकीन अधिकाऱ्याचा जाच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 11:35 PM2019-11-19T23:35:35+5:302019-11-19T23:35:54+5:30
महासभेत उघड झाली बाब; नगरसेविकांनी सांगितली आपबिती
ठाणे : वागळे प्रभाग समितीचा एक अधिकाºयाच्या वर्तवणुकीमुळे या समितीमधील महिला कर्मचारीआणि येथील नगरसेविकादेखील हैराण झाल्याची बाब मंगळवारी झालेल्या महासभेत उघड झाली. विशेष म्हणजे या अधिकाºयाकडून होणाºया वर्तवणुकीचे वर्णन करतांनाही महिलांच्या मनात लाज उत्पन्न होते असे त्या अधिकाºयाचे वागणे असून या अधिकाºयाला पुन्हा शासनाकडे पाठविण्याची मागणी यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. अखेर त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना पुन्हा शासनाकडे पाठविण्यात यावे, असे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले.
वागळे प्रभाग समितीच्या अध्यक्षा शिल्पा वाघ यांनी या विषयाला सभागृहात वाचा फोडली. हा नवा अधिकारी सुरुवातीला आला तेव्हा चांगले काम करतो असे वाटत होते. मात्र, त्याचे प्रताप हळूहळू दिसू लागले. मागील चार महिन्यांपासून त्यांचे वर्तन अतिशय वाईट झाले असून महिला कर्मचारी दहशतीखाली काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. वागळे प्रभाग समितीच्या सर्व नगरसेविकांनीदेखील हाच सूर लावला. विशेष म्हणजे या सर्व प्रकारामध्ये पीडित एका महिलेला ब्रेन हॅमरेज झाल्याची धक्कादायक माहितीदेखील माजी महापौर अशोक वैती यांनी उघड केली. यासंदर्भात जर योग्य निर्णय घेतला गेला नाही तर एक शिवसैनिक म्हणून हे सर्व प्रकार हाताळण्यात येईल, असा पवित्रा वैती यांनी घेतला. त्यामुळे या अधिकाºयावर कारवाई झाली नाही तर आणि या महिलांना न्याय देता आला नाही तर शिवसेनेची नगरसेविका आणि प्रभाग समिती अध्यक्षा म्हणून राजीनामा देण्याइतपत भावना निर्माण झाली असल्याचे वाघ यांनी सांगितले.
वरिष्ठांनी समज दिल्यावर वाढविले ‘आंबट’ प्रताप
या सर्व प्रकाराच्या माहितीची यादीच प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना यासंदर्भात समजदेखील देण्यात आली होती. मात्र, हा प्रकार कमी होण्याच्या ऐवजी वाढला.
अखेर हा विषय वाघ यांनी सभागृहात आणल्यानंतर त्यावर सर्वच नगरसेविकांनी त्यांची ठाणे महापालिकेतील सेवा संपुष्टात आणून त्यांना पुन्हा शासनाच्या सेवेत पाठवण्याची मागणी केली.
यावर विरोधी पक्षनेत्यांनी हा ठराव मांडला तर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी अनुमोदन दिले. नंतर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी त्यांना पुन्हा शासनाच्या सेवेत पाठवण्याचे आदेश यावेळी प्रशासनाला दिले. तर यापुढे त्यांना प्रभाग समितीमध्ये येण्यास मज्जाव करावा असेही त्यांनी सांगितले.