ठाण्यात महापौर नरेश म्हस्के यांच्या पुढाकारामुळे निवासी डॉक्टरांचा संप टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 06:44 PM2021-05-21T18:44:23+5:302021-05-21T18:44:45+5:30
कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून सेवा देणारे निवासी डॉक्टर हे त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे संपावर जाण्याच्या मनस्थितीत होते
ठाणे : कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून सेवा देणारे निवासी डॉक्टर हे त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे संपावर जाण्याच्या मनस्थितीत होते, परंतु महापौर नरेश म्हस्के यांनी निवासी डॉक्टरांच्या मागण्या लक्षात घेवून आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याशी तात्काळ चर्चा केली व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करावी व फरकाची रक्कम देखील अदा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर हे विद्यावेतनात वाढ करणेबाबत सतत प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते, मात्र प्रशासनाकडून वेळेत कार्यवाही न झाल्याने या निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा प्रशासनास दिला होता. परंतु सद्यस्थिती विचारात घेता अशा प्रकारे डॉक्टरांनी संप पुकारु नये यासाठी महापौरांनी तात्काळ प्रशासनासोबत बैठक आयोजित केली व त्यांना देय असलेली वेतनवाढ तात्काळ लागू करावी असे आदेश दिले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, संजय हेरवाडे, उपायुक्त मुख्यालय मारुती खोडके, अधिष्ठाता भीमराव जाधव, वैद्यकीय अधिकारी वैजयंती देवगीकर तसेच निवासी डॉक्टर उपस्थित होते.
कोविड 19 च्या काळात निवासी डॉक्टरांनी खूप चांगले काम केले आहे, ठाणे शहरातील सर्व कोरंटाईन सेंटर्स, ग्लोबल कोविड सेंटर तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातही या डॉक्टरांनी आपली सेवा बजावली असल्याचेही महापौरांनी यावेळी नमूद केले. आज जवळपास 160 निवासी डॉक्टर कार्यरत आहेत, या सर्व डॉक्टरांनी कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून सेवा दिलेली आहे, या निवासी डॉक्टरांना 46499 इतके विद्यावेतन देण्यात येत होते, या बैठकीमध्ये प्रशासनाची चर्चा करुन शासन निर्णयानुसार त्यांना आजपर्यत न देण्यात आलेली 10 हजारांची वाढ त्यांच्या मासिक विद्यावेतनात तात्काळ लागू करावी असा आदेश महापौरांनी दिला.
मुंबईतील निवासी डॉक्टरांच्या धर्तीवर शासन निर्णयाचा अभ्यास करुन संबंधितांना योग्य विद्यावेतन मिळेल या दृष्टीकोनातून तातडीने कार्यवाही करावी अशीही सूचना यावेळी महापौर यांनी केली. तसेच या बैठकीत राजीव गांधी महाविद्यालयातील अन्य महत्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. यामध्ये निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलची डागडुजी करणे, कँटीनमध्ये जेवणाची चांगली व्यवस्था करणे तसेच शासनाच्या निर्णयानुसार फी मध्ये सवलत देणेबाबत विचार करण्यात येईल असेही महापौरांनी या बैठकीदरम्यान नमूद केले.