ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ३२३ दिवसांवर, रुग्णवाढीचा वेग ०.२५ टक्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 04:00 PM2021-05-18T16:00:13+5:302021-05-18T16:00:37+5:30
ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत १ लाख २६ हजार ६८७ करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख २१ हजार ४१३ रु ग्णांनी आतार्पयत कोरोनावर मात केली आहे.
ठाणे: मागील काही दिवसापासून ठाण्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. यापूर्वी रुग्णवाढीचा वेग हा १.५७ टक्यांवर होता. तोच आता ०.२५ टक्यांवर आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी हा अगदी महिनाभरात ५२ दिवसावरून थेट ३२३ दिवसांवर आल्याने ठाणेकरांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब म्हणावी लागणार आहे. त्यातही मृत्यूदर रोखण्यातही पालिकेला काहीसे यश आल्याचे दिसून आले असून सध्या मृत्यूदर हा १.४४ टक्यांवर आला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे रुग्णवाढीपेक्षाही अधिक असल्याचे दिसून आले आहे. (Thane the duration of doubling of patients is 323 days and the rate of growth is 0.25 per cent)
ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत १ लाख २६ हजार ६८७ करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख २१ हजार ४१३ रु ग्णांनी आतार्पयत कोरोनावर मात केली आहे. त्याचे प्रमाण ९५.८४ टक्के इतके आहे. आतापर्यंत १ हजार ८३० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या प्रत्यक्षात शहरात ३ हजार ४४४ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील १ हजार ११९ रुग्णांना सोम्य लक्षणो आहेत. तर १ हजार ८६२ रुग्णांना कोणत्याही स्वरुपाची लक्षणे नाही. तर ४६३ रुग्ण हे क्रिटीकल असून, २९३ आयसीयू आणि १७० रुग्ण व्हॅन्टीलेटरवर उपचार घेत आहेत.
महिनाभरापूर्वी म्हणजेच १६ एप्रिल रोजी शहरात प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १६ हजार ५ इतकी होती. त्यावेळेस रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के इतके होते. परंतू गेल्या महिनाभरात ठाणे महापालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे करोनाचा संसर्ग काहीसा कमी झाला असून त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होऊन ते आता ९५.८४ टक्के इतके झाले आहे. असे असतानाच दुसरीकडे रुग्ण दुपटीच्या कालावधीतदेखील कमालीचा फरक पडल्याचे दिसून आले आहे. १६ एप्रिलला रुग्ण दुपटीचा कालावधी ५२ दिवसांवर आला होता. महिनाभरात आता रुग्ण दुपटीचा कालवधी ३२३ दिवसांवर आला असून यामुळे शहरात करोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याचे स्पष्ट होत आहे.
दुसरीकडे मागील महिनाभरात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ही नवीन रुग्णांपेक्षा अधिक असल्याचेही दिसून आले आहे. मागील १० दिवसात शहरात ३ हजार ४४९ नवे रुग्ण आढळले असले तरी याच कालावधी दुप्पट रुग्णांनी म्हणजेच ६ हजार ७६२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे निश्चितच ही ठाणेकरांसाठी दिलासादायक बाब म्हणावी लागणार आहे.
तारीख - नवे रुग्ण - बरे झालेले रुग्ण
०९ मे - ४७९ - ९६१
०९ मे - ४०६ - ८५३
१० मे - ३८८ - ६८५
११ मे - २९० - ७२३
१२ मे - ४०९ - ७४६
१३ मे - ३३९ - ५०८
१४ मे - ३२५ - ५४७
१५ मे - ३०६ - ७०६
१६ मे - २७४ - ५९६
१७ मे - २३३ - ४३७
----------------------
एकूण - ३४४९- ६७६२