Thane: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत लाखोंचे विदेशी मद्य जप्त, वाहनांसह २५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात
By जितेंद्र कालेकर | Published: October 11, 2024 07:49 PM2024-10-11T19:49:23+5:302024-10-11T19:49:47+5:30
Thane Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवी मुंबईतील महापे एमआयडीसी आणि शहापूर आडगाव भागात दोन वाहनांमधून होत असलेल्या बेकायदेशीर गोवा व दमण निर्मित विदेशी बनावटीच्या मद्य वाहतूकीवर धडक कारवाई केली.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवी मुंबईतील महापे एमआयडीसी आणि शहापूर आडगाव भागात दोन वाहनांमधून होत असलेल्या बेकायदेशीर गोवा व दमण निर्मित विदेशी बनावटीच्या मद्य वाहतूकीवर धडक कारवाई केली. या धाडीत दोन वाहनांसह २५ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी शुक्रवारी दिली.
नवी मुंंबईच्या महापे शीळ रस्त्याच्या कडेला महापे एमआयडीसी भागात तसेच शहापूर आडगाव भागातून बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती उपायुक्त पवार यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक प्रविण तांबे, उपअधीक्षक वैद्य, ए. डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या भरारी पथकाचे निरीक्षक एम. पी. धनशेट्टी यांच्या पथकाने ५ ऑक्टाेंबर २०२४ रोजी रात्री १०.२० वाजण्याच्या सुमारास महापे शीळ रोडवर एका टेम्पोतून तसेच शहापूर आडगाव रोडवरील अन्य एका टेम्पोतून ५ ऑक्टाेंबर रोजी पहाटे २.२० वाजण्याच्या सुमारास भारतीय बनावटीचे गोवा व दमण निर्मित ११८ बॉक्स विदेशी मद्य जप्त केले. याप्रकरणी अजय पाटील आणि सुनिल यादव या दोघांना अटक केली आहे.