माकडाच्या हाती मोबाइलचे कोलित दिल्याचे परिणाम

By संदीप प्रधान | Published: September 2, 2024 01:09 PM2024-09-02T13:09:25+5:302024-09-02T13:09:50+5:30

Thane News: बलात्काराचे गुन्हे वाढले असून, जनजागृतीमुळे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाणही वाढले आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या मानवी संबंधाचा हा गुंता सोडवण्यात अपयश आले, तर परिस्थिती अधिक बिकट होणार आहे.

Thane: Effects of handing a mobile phone to a monkey | माकडाच्या हाती मोबाइलचे कोलित दिल्याचे परिणाम

माकडाच्या हाती मोबाइलचे कोलित दिल्याचे परिणाम

- संदीप प्रधान
(वरिष्ठ सहायक संपादक) 

बदलापूरमधील एका खासगी शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर चतुर्थश्रेणी कर्मचारी अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केल्यानंतर असंख्य प्रश्नांचे मोहोळ उठले. बदलापुरातील दडपलेली लैंगिक अत्याचाराची प्रकरणे उघड झाली. बदलापूरमध्ये जेमतेम साडेतीन वर्षांच्या मुली वासनेच्या शिकार झाल्या, तर लातूरमध्ये एका सत्तर वर्षांच्या महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली गेली. बलात्काराचे गुन्हे वाढले असून, जनजागृतीमुळे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाणही वाढले आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या मानवी संबंधाचा हा गुंता सोडवण्यात अपयश आले, तर परिस्थिती अधिक बिकट होणार आहे.

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्येनंतर जनआक्रोश उफाळून आल्याने बलात्कार व हिंस्त्र पद्धतीने महिलेची हत्या करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याची तरतूद केली. देहदंडाच्या शिक्षेच्या भीतीमुळे खरेतर अशी कृत्ये करण्यास कुणी धजावणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात बलात्कारानंतर स्त्रीयांशी हिंस्त्र वर्तणूक करण्याकडील कल वाढला आहे. जबरदस्ती केलेल्या महिलेने तक्रार करू नये, याकरिता तिला संपविण्याची प्रवृत्ती वाढली आहे, हे दुर्दैव आहे. या सर्व घटनांबाबत पोलिसी निष्काळजीपणा, कुटुंबातील व्यक्तीच लैंगिक शोषण करत असेल, तर प्रकरण दडपण्याची प्रवृत्ती वगैरे बाबी आहेत. बदलापूरच्या प्रकरणातही शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक यांनी तक्रार न करण्याकरिता मुलीच्या पालकांवर दबाव टाकला. संस्थाचालक हे राजकीय पक्षांशी लागेबांधे असलेले असल्याने पोलिसांनीही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, विविध कारणांमुळे बदलापूरकरांच्या मनात दाटलेला असंतोष त्सुनामीसारखा उफाळून आल्याने भल्याभल्यांची टगेगिरी पालापाचोळ्यासारखी उडून गेली.
गंभीर स्वरूपाचे गुन्हे न नोंदण्याकडे पोलिसांचा कल असल्याचा एक जळजळीत अनुभव येथे नमूद करायलाच हवा. काही वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. डोंबिवलीतील एका पांढरपेशा कुटुंबातील महिलेचे मंगळसूत्र मारले. ती तक्रार करायला गेली, तर पोलिसांनी तिची तक्रार न घेता अन्य कुठल्या प्रकरणात पोलिसांकडे पडून असलेले मंगळसूत्र स्वीकारण्याचा आग्रह धरला. तिने त्यास नकार दिला. हे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यावर तत्कालीन पोलिस आयुक्तांचा तिळपापड झाला. त्यामुळे बदलापूर प्रकरणात पोलिसांनी दडवादडवी केली, हे नाकारता येत नाही.

देशात अशिक्षित व अल्पशिक्षित यांची, तसेच बेरोजगार व अर्धवेळ रोजगार असलेल्यांची संख्या प्रचंड आहे. परंतु, अनेकांकडे स्मार्टफोन आहे. महिन्याकाठी आठ ते दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून जेमतेम स्वत:च्या गरजा भागविणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा तरुण-तरुणीकरिता भविष्यकाळ अंधकारमय आहे.

स्वत:चे घर, संसार अशी स्वप्ने पूर्ण होण्याची या वर्गाला आशा नाही व अनेकांची इच्छाही नाही. आजचा दिवस, आताचा क्षण जगायचा, अशी त्यांची भावना आहे. त्यांच्या स्मार्ट फोनमध्ये श्रीमंतांचे शौक, पोर्न फिल्म, विद्वेष वाढवणारा कंटेंट सर्व ठासून भरले आहे. या वयोगटातील अनेकांना सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवण्याकरिता वाचन करणे ही गरज आहे, हेही मान्य नाही. रील्स व ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसिरीज पाहण्यात ते मग्न आहेत. वेबसिरीजमध्ये स्त्रियांशी हिंसक व्यवहाराचा बेलगाम मारा आहे. रील आणि रिअल लाइफ यामधील सीमारेषा धूसर होऊन ओरबाडण्याची, कुठल्याही थराला जाऊन परिणामांचा विचार न करता आपले शौक पूर्ण करण्याची वृत्ती बळावली आहे. विचार करून कृती करण्याशी असलेली नाळ तुटलेला, असा माणूस हा माकडासारखा वागत आहे. त्यात त्याच्या हातात आपणच मोबाइलचे कोलित दिले आहे.

Web Title: Thane: Effects of handing a mobile phone to a monkey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.