ठाण्यात एकाच दिवसात एका अधिकाऱ्यासह आठ पोलिसांना कोरोनाची लागण
By जितेंद्र कालेकर | Published: May 25, 2020 01:08 AM2020-05-25T01:08:10+5:302020-05-25T01:12:16+5:30
ठाणे शहरात रविवारी एकाच दिवसात वाहतूक नियंत्रण शाखेच्या एका अधिका-यासह आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. एकीकडे आतापर्यंत ४८ पोलिसांनी कोरोनावर मात केली असतांना दुसरीकडे पोलिसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्याही वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात रविवारी एकाच दिवसात एका उपनिरीक्षकासह आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत १०४ पोलीस कोरोनामुळे बाधित झाले असून एका महिला पोलिसाचा यात मृत्यु झाला आहे. शनिवारी एका अधिकाºयाचे ठाण्यातील रहिवाश्यांनी वाजत गाजत जोरदार स्वागत केले. आतापर्यंत ४८ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनामुळे बाधित होणाºया पोलिसांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे कोरोनावर मात करुन रुग्णालयातून सुखरुप घरी परतणाºया पोलिसांची संख्याही लक्षणीय असली तरी पोलिसांमध्ये कोरोनाच्या शिरकावामुळेही चिंता व्यक्त होत आहे. २४ मे रोजी एकाच दिवसात वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकाला वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. कळवा पोलीस ठाण्याचे दोन हवालदार आणि एका पोलीस शिपायाला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना कळवा येथील सफायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यातील एका जमादारासह महिला पोलीस कॉन्स्टेबलचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही घोडबंदर रोडवरील वेदांत रुग्णालयात रविवारी दाखल केले आहे. पोलीस मुख्यालयातील एका महिला कर्मचाºयासह दोघांना लागण झाल्यामुळे त्यांनाही कळवा येथील सफायर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
........................
* या कोरोनाबाधित आठ पोलिसांच्या संपर्कात आलेल्या पोलीस तसेच नागरिकांचीही आता माहिती घेण्यात येत असून त्यांनाही कॉरंटाईन केले जाणार आहे.
*आतापर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात १३ अधिकारी आणि ९१ कर्मचारी अशा १०४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचाºयाचा मृत्यु झाला. तर ४८ पोलिसांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे सध्या ७१ कर्मचारी होम कॉरंटाईन तर दोघा पोलिसांना केंद्रामध्ये कॉरंटाईन केले आहे.
* वाजत गाजत स्वागत
कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकाला १३ मे रोजी ताप आल्यामुळे त्यांची त्याच दिवशी तपासणी करुन त्यांना तातडीने वेदांत रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची १४ मे रोजी कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह आली. अवघ्या ११ दिवसांतच त्यांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले. त्यांच्या दोन्ही तपासण्या निगेटीव्ह आल्या. ब्रम्हांड भागातील स्थानिक रहिवाशांनी या अधिकाºयाचे अगदी ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले.