ठाणे : एकनाथ शिंदे, फडणवीस यांचा १६ ऑक्टोबरला होणार भव्य सत्कार
By अजित मांडके | Published: October 14, 2022 02:32 PM2022-10-14T14:32:13+5:302022-10-14T14:33:20+5:30
१६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पार पडणार आहे कार्यक्रम.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भव्य सत्कार सोहळा १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. देशातील विविध भागातून ठाणे आणि मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या बंजारा समाजाचे प्रश्न आणि त्यांना येणाऱ्या विविध समस्या यावर प्रकाश टाकण्यासाठी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडेल. ठाण्यातील ढोकाळी भागातील हायलँड मैदानात हा कार्यक्रम पार पडेल. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
या मेळाव्यामध्ये राज्यभरातील लाखोच्या संख्येने बंजारा समाज या मेळावामध्ये येणार असल्याचे अध्यक्ष डॉ.शंकर पवार यावेळी म्हणाले. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी शुक्रवारी संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
ठाण्यातील हायलँड मैदानात आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य सत्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सोबत प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, गुलबर्गा लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. उमेश जाधव उपस्थित राहणार आहेत.