Thane: बंड शिंदेंचे, धास्तावले मात्र स्वयंसेवक, प्रथम कोण, संघ शाखा की आनंद सेना शाखा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 11:13 AM2022-06-23T11:13:21+5:302022-06-23T11:24:31+5:30

Thane Politics: ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडात जिल्ह्यातील कल्याण-डाेंबिवली,  भिवंडी, मीरा-भाईंदर, अंबरनाथमधील आमदार सहभागी असल्याने या शहरांतील आमदारकीची निवडणूक  लढवू इच्छिणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर ‘संघ दक्ष’  म्हणत आता या बंडखोरांचाच प्रचार  करण्याची नामुष्की ओढवणार आहे.

Thane: Eknath Shinde Rebel, but RSS Swayamsevak in In anxiety | Thane: बंड शिंदेंचे, धास्तावले मात्र स्वयंसेवक, प्रथम कोण, संघ शाखा की आनंद सेना शाखा

Thane: बंड शिंदेंचे, धास्तावले मात्र स्वयंसेवक, प्रथम कोण, संघ शाखा की आनंद सेना शाखा

googlenewsNext

- नारायण जाधव
नवी मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडात जिल्ह्यातील कल्याण-डाेंबिवली,  भिवंडी, मीरा-भाईंदर, अंबरनाथमधील आमदार सहभागी असल्याने या शहरांतील आमदारकीची निवडणूक  लढवू इच्छिणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर ‘संघ दक्ष’  म्हणत आता या बंडखोरांचाच प्रचार  करण्याची नामुष्की ओढवणार आहे. यामुळे शिंदे यांच्या बंडाने राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री  होणार असले, तरी स्थानिक पातळीवरील स्वयंसेवक धास्तावले आहेत.

एकेकाळी रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ ते भाजपचा बालेकिल्ला म्हणून  ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्याला आनंद दिघे यांनी आपल्या कुशल नेतृत्व आणि संघटन कौशल्याच्या बळावर  शिवसेनेचा बालेकिल्ला बनविले. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर, अंबरनाथ-बदलापूर या शहरांत निर्विवाद सत्ता मिळवली. नवी मुंबईत गणेश नाईकांच्या बंडानंतर येथील बालेकिल्ला प्रथम  खिळखिळा झाला. मात्र, तरीही जिल्ह्यात शहर असो वा शहापूर, वाडा यासारखा ग्रामीण भाग प्रत्येक ठिकाणी  शिवसेनेने आपल्या ‘बळावर’ निवडणुका जिंकल्या. यात अनेक निष्ठावंत स्वयंसेवकांना त्रास देण्यात आला. मात्र, तरीही नारायण मराठे, संजय  केळकर, राम पातकर यांच्यासारख्या स्वयंसेवकांनी भाजपचे अस्तित्व टिकवून ठेवले. नंतरच्या काळात  कल्याण-डोंबवलीत रवींद्र चव्हाण, नरेंद्र पवार यांनी भाजपला सुगीचे दिवस दाखवले. मात्र, आता ज्यांच्याविरुद्ध दोन हात  केले, त्या एकनाथ शिंदे आणि कंपनीची ‘साथसंगत’ या मंडळींना करावी लागणार आहे.

चौकीदार बनून संघ दक्ष म्हणायचे का?
ठाण्यात  संजय केळकर यांना एकनाथ शिंदे यांचा आणि कल्याण-डोंबिवलीत नरेंद्र पवार यांना विश्वनाथ भोईर आणि मीरा-भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांना प्रताप सरनाईक आणि त्यांच्या नातलगांचा प्रचार करावा लागणार  आहे. हे बंडखोर आणि त्यांच्या समर्थकांसाठी यापुढील सर्व निवडणुकांत भाजप कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलाव्या लागणार आहेत. केवळ विधानसभाच नव्हे तर पालिका निवडणुकीत संदीप लेले, संजय वाघुले, मृणाल पेंडसे  यांना कदाचित आपल्या नगरसेवकपदावर पाणी सोेडून एकनाथ शिंदे समर्थकांचा प्रचार करून त्यांच्या  कार्यालयांचे ‘चौकीदार’ म्हणून काम करावे लागणार आहे. डोंबिवलीत तर ‘शेठ’ की रवींद्र चव्हाण याच कल्पनेने स्वयंसेवकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.   

 यापूर्वी भाजपच्या या निष्ठावान कार्यकर्त्यांनी ‘संघ दक्ष’ म्हणून मुरबाड-भिवंडीमध्ये एकेकाळचे विरोध असलेल्या  किसन कथोरे, कपिल पाटील यांच्यासाठी आपल्या चपला झिझवल्या आहेत. 
 मात्र, आता विधानसभा, लोकसभाच नव्हे तर स्थानिक पातळीवरील महापालिका, नगरपालिकेच्या नगरसेवक पदावर पाणी सोडून बालाजी किणीकर, विश्वनाथ भोईर, प्रताप सरनाईक, शांताराम मोरे या एकनाथ शिंदे समर्थक आमदार  आणि त्यांच्या समर्थकांसाठी आमदारकीसह नगरसेवक पदाचा त्याग करावा लागणार आहे.
 शिस्तप्रिय असलेल्या स्वयंसेवकांना आता संघ शाखेऐवजी आनंद सेनेच्या शाखेत ‘संघ दक्ष’ म्हणत चौकीदारी करावी लागते की काय, या कल्पनेनेच चलबिचलता वाढली आहे.

Web Title: Thane: Eknath Shinde Rebel, but RSS Swayamsevak in In anxiety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.