Thane: अंबरनाथ पूर्वेत १७ ग्राहकांकडून २० लाखांची वीजचोरी
By अनिकेत घमंडी | Updated: October 19, 2023 18:18 IST2023-10-19T18:17:49+5:302023-10-19T18:18:05+5:30
Thane: महावितरणच्या अंबरनाथ पूर्व उपविभागात गेल्या दोन आठवड्यात २० लाख ५० हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी वीज वापराची नोंद कमी करणारी यंत्रणा मीटरमध्ये बसवून फेरफार करणाऱ्या १७ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

Thane: अंबरनाथ पूर्वेत १७ ग्राहकांकडून २० लाखांची वीजचोरी
- अनिकेत घमंडी
डोंबिवली - महावितरणच्या अंबरनाथ पूर्व उपविभागात गेल्या दोन आठवड्यात २० लाख ५० हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी वीज वापराची नोंद कमी करणारी यंत्रणा मीटरमध्ये बसवून फेरफार करणाऱ्या १७ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि कल्याण दोन मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वीजचोरी शोध मोहिम सुरू आहे. या मोहिमेत गेल्या दोन आठवड्यात अंबरनाथ पूर्व उपविभागातील १८०० सिंगल फेज मीटर ॲक्युचेकद्वारे तपासले. संशयास्पद आढळलेल्या १७ मीटरची ग्राहकांसमक्ष तपासणी करण्यात आली. यात मीटरमध्ये अतिरिक्त विद्युत अवरोधक टाकून मीटरची गती कमी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या १७ ग्राहकांनी २० लाख ५३ हजार ६४० रुपये किंमतीची ८६ हजार ६६५ युनिट विजेची चोरी केल्याचे आढळून आले. वीजचोरीचे देयक व तडजोडीची रक्कम भरण्याची नोटिस संबंधित ग्राहकांना देण्यात आली असून ही रक्कम विहित मुदतीत न भरणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे.
उल्हासनगर दोन विभाग कार्यालयाचे कार्यकारी अभियंता प्रविण चकोले यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ पूर्व उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती, सहाय्यक लेखापाल मयुरी बोरसे, सहाय्यक अभियंता वैशाली पाटील, प्रतिक म्हात्रे, हरेश विशे, प्रशांत नाहीरे, मोहित ठाकूर व रविंद्र नाहिदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.