ठाण्यात टोइंग व्हॅनवरील कर्मचा-याची तरूणीला मारहाण, चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:17 AM2017-08-23T01:17:46+5:302017-08-23T01:17:58+5:30
ठाणे : टोइंग पथकातील खासगी कर्मचा-यांनी एका संगीत शिक्षिकेची छेड काढून, तिला जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ठाण्यात घडली. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली.
ठाण्यातील वसंतविहारमध्ये राहणारी २१ वर्षीय युवती हायपरसिटी मॉलमध्ये संगीत शिक्षिका आहे. सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास तिने शेअर रिक्षा घेतली. रिक्षामध्ये एक पुरुष आणि एक अन्य महिला प्रवासी होती. घोडबंदर रोडने रिक्षा जाताना, बाजूनेच वाहतूक पोलिसांची टोइंग व्हॅनही जात होती. व्हॅनच्या चालकाने रिक्षात बसलेल्या पीडित युवतीकडे बघून इशारे करायला सुरुवात केली. हा प्रकार बराच वेळ सुरू होता. ब्रह्मांड सिग्नलजवळ आॅटोरिक्षा थांबली, तेव्हा व्हॅनच्या मागे उभ्या असलेल्या टोइंग पथकातील आणखी एका युवकाने युवतीला बघून अश्लील हातवारे केले. आॅटोचालकाने त्यांना हटकले असता, त्यांनी चालकास दमदाटी केली. सिग्नल मोकळा झाल्यानंतर टोइंग व्हॅन समोर निघून गेली. थोड्याच अंतरावर असलेल्या फ्लायओव्हरजवळ टोइंग व्हॅनवरील एक युवक रॉड घेऊन उभा होता. त्याने रिक्षा जवळ येताच रॉडने जोरदार वार केला. हा वार युवतीच्या मांडीवर बसून तिला जबर दुखापत झाली. महत्त्वाचे म्हणजे, हा संपूर्ण प्रकार घडत होता, त्या वेळी वाहतूक पोलिसांचा एक कर्मचारी टोइंग व्हॅनमध्ये बसून होता. या वाहतूक पोलिसाने टोइंग कर्मचाºयांना हटकण्याचाही प्रयत्न केला नसल्याचा आरोप युवतीने केला.
याची तक्रार देण्यासाठी युवती संध्याकाळी कापूरबावडी पोलीस ठाण्यात पोहोचली. घटना पाहता, पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे पोलीस ठाण्यात दाखल झाले. रात्री ११ वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल करून, दुर्वेश राजू जाधव, शमशाद बबलू खान, राकेश कृष्णामोहन झा, रमेश धिरूभाई यांना अटक केली. न्यायालयाने मंगळवारी त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
घटना अतिशय गंभीर आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चौकशी केली जाणार असून, कुणाचीही गय केली जाणार नाही, तसेच यापुुढे चारित्र्य पडताळणी करूनच टोइंग पथकात कर्मचाºयांची नेमणूक केली जाणार असून, त्यांचा खासगी तपशीलही तपासला जाईल
- सुनील लोखंडे,
पोलीस उपायुक्त, ठाणे.