Thane: गृहसंकुले, शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्थांसाठी ठाणे महापालिकेची पर्यावरण स्पर्धा

By अजित मांडके | Published: February 21, 2024 02:18 PM2024-02-21T14:18:14+5:302024-02-21T14:24:23+5:30

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण स्पर्धेत गृहसंकुले, शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था, महाविद्यालये, शासकीय कार्यालये यांना एकूण ५० लाख रुपयांची विविध गटांतील पारितोषिके जिंकण्याची संधी आहे.

Thane: Environmental competition of Thane Municipal Corporation for housing complexes, educational institutions, commercial establishments, industrial establishments | Thane: गृहसंकुले, शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्थांसाठी ठाणे महापालिकेची पर्यावरण स्पर्धा

Thane: गृहसंकुले, शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्थांसाठी ठाणे महापालिकेची पर्यावरण स्पर्धा

- अजित मांडके 
ठाणे - ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण स्पर्धेत गृहसंकुले, शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था, महाविद्यालये, शासकीय कार्यालये यांना एकूण ५० लाख रुपयांची विविध गटांतील पारितोषिके जिंकण्याची संधी आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या स्पर्धेतील सहभागासाठी अंतिम मुदत २९ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.

राज्य शासनाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 1.0 मध्ये ठाणे महानगरपालिकेस अमृत शहराच्या गटात प्राप्त झालेल्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाच्या रकमेतून या पर्यावरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध घटकांमध्ये उदा. गृहसंकुले, शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था, इतर शासकीय कार्यालये, महाविद्यालये आदींसाठी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यात प्रभाग समिती स्तरावर गुणांकन करून या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५० लाख रुपयांची बक्षिसे महापालिका देणार असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली आहे.

अशी आहे स्पर्धा आणि अशी आहेत पारितोषिके
पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धा, जनजागृती स्पर्धा अशा दोन स्वरुपात स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धा ही संस्थात्मक पातळीवरील आहे. तर, जनजागृती स्पर्धा सर्व ठाणेकरांकरिता खुली आहे. पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धेमध्ये विजेत्यांना प्रत्येक प्रभाग समितीक्षेत्रात रु. ५१ हजाराचे प्रथम पारितोषिक, रु. २१ हजाराचे द्वितीय पारितोषिक व रु. ११ हजाराचे तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे. जनजागृती स्पर्धेकरिता महापालिका स्तरावर रु. एक लाखाचे प्रथम पारितोषिक, रु. ५१ हजाराचे द्वितीय पारितोषिक व रु. २१ हजाराचे तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे. एकूण विविध स्वरुपाची १४८ बक्षिसे महापालिकेद्वारे देण्यात येणार आहे.

ऑनलाईन नोंदणी सुरू आहे
स्पर्धेचे आयोजन अत्यंत सोप्या पद्धतीने केलेले असून ही स्पर्धा संपूर्णपणे ऑनलाईन स्वरुपात असणार आहे. त्याकरिता इच्छुक स्पर्धकांना https://tmc.majhivasundhara.com या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करुन आपली माहिती सादर करायची आहे. स्पर्धेकरिताचे सर्व नियम संकेतस्थळावर देण्यात आलेले असून स्पर्धेकरिता तांत्रिक मदत उपलब्ध होण्याकरिता संबंधितांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे
या स्पर्धेसाठी आतापर्यंत ३००हून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली असून अधिक स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होता यावे याकरिता महापालिकेने स्पर्धेला मुदतवाढ दिली आहे. तरी या संधीचा नागरिक व संस्थांनी लाभ घेऊन स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.

Web Title: Thane: Environmental competition of Thane Municipal Corporation for housing complexes, educational institutions, commercial establishments, industrial establishments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.