Thane: मतदानाचा हक्क बजाविणे ही काळाची गरज, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
By सुरेश लोखंडे | Published: January 25, 2024 09:59 PM2024-01-25T21:59:38+5:302024-01-25T22:00:09+5:30
Thane News: लोकशाही प्रगल्भ बनविण्याबरोबरच विविध विचारांवर आधारित व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी भारतीय संविधानाने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजावणे, ही काळाची गरज आहे.
ठाणे - लोकशाही प्रगल्भ बनविण्याबरोबरच विविध विचारांवर आधारित व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी भारतीय संविधानाने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजावणे, ही काळाची गरज आहे. मतदानाच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्टीच्या दिवशी बाहेरगावी सुट्टीसाठी न जाता नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय मतदान दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्यासह जेष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी, बांदोडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विंदा मांजरमकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत सरकारमध्ये प्रतिनिधी पाठविण्यासाठी मतदान गरजेचे आहे. जनतेच्या विचाराचे प्रतिबिंब मतदानामध्ये उमटून सरकार निवडले जाते. त्यासाठी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक पात्र मतदाराने मतदानाचा हक्क नक्की बजावावा., असे सांगितले. तर डाँ. ओक यांनी मतदान हा हक्क असून, तो आवर्जून बजावायला हवा. नवीन पिढीला समजून घ्यायला हवे. आजची पिढी खूप स्मार्ट आहे. उमेदवार चांगला असेल, तर त्याला मतदारांकडून मतदानाच्य रुपाने निश्चित चांगला प्रतिसाद दिला जाईल, असे मत व्यक्त करुन योग्य उमेदवार निवडण्यासाठी पूरक व्यवस्था आवश्यक आहे. ती भूमिका निवडणूक आयोगाकडून पार पाडली जात आहे, अशा शब्दात ओक यांनी शासकीय व्यवस्थेचे कौतुक केले.