ठाणे फेस्टिव्हल : मंत्री जितेंद्र आव्हाडांवर पोलीस आयुक्तांची स्तुतिसुमने
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 12:58 AM2020-01-25T00:58:05+5:302020-01-25T00:58:43+5:30
पूर्वी लोक कळवा बघून गाडी वळवा, असे म्हणायचे. आता लोक कळवा बघून गाडी पळवा, असे म्हणत आहेत. अत्यंत कमी काळात एवढा विकास झालेले हे एकमेव ठिकाण आहे.
ठाणे : पूर्वी लोक कळवा बघून गाडी वळवा, असे म्हणायचे. आता लोक कळवा बघून गाडी पळवा, असे म्हणत आहेत. अत्यंत कमी काळात एवढा विकास झालेले हे एकमेव ठिकाण आहे. कळवावासीयांनी नक्कीच चांगले प्रतिनिधी निवडून दिले आहेत, हे हा विकास आणि ठाणे फेस्टिव्हलकडे पाहून प्रतीत होत आहे, अशा स्तुतिसुमनांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे कौतुक केले.
संघर्ष या सेवाभावी संस्थेच्या वतीने खारीगाव येथील ९० फूट रस्त्यावर आयोजित ठाणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनांनतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर बोलत होते. यावेळी या फेस्टिव्हलचे संयोजक गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, ऋता आव्हाड, संघर्षचे अध्यक्ष विनय परळीकर, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक मुकुंद केणी, प्रकाश बर्डे आदींसह इतर नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
फणसळकर पुढे म्हणाले की, हा फेस्टिव्हल म्हणजे कळव्याची वैशिष्ट्यपूर्ण ओळख झाली आहे. हायक्वॉलिटी आर्ट काय असते, हे येथे दिसून येत आहे. कळवा आणि ठाणेकरांनी आव्हाड यांचे आभारच मानायला हवेत की, त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे.
कलासंस्कृतीचा मेळा
चित्रकला, शिल्पकला, संस्कृती, संगीत आणि खाद्यपदार्थ यांचा सुरेख संगम साधणारा कलासंस्कृतीचा मेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवाला पहिल्याच दिवशी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रसेनजित कोसंबी, प्रिया बर्वे, वैशाली माडे आणि अवधूत गुप्ते यांनी आपल्या सांगीतिक मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले, तर फेस्टिव्हलच्या दुसºया दिवशी सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत विक्रांत शितोळे या चित्रकाराने आपल्या हातातील ब्रशमधून वॉटर कलरवर आधारित लॅण्डस्केप पेंटिंगचा खास नमुना पेश केला. त्यानंतर, २४ रोजी मीत ब्रदर्स आणि खुशबू ग्रेवाल यांचा रॉकिंग परफॉर्मन्सही सादर झाला.