Thane: सरकारी जमिनीवर तब्बल ६० कच्ची बांधकामे करून भाड्याने देणाऱ्या भूमाफियावर अखेर गुन्हा दाखल
By धीरज परब | Published: July 24, 2024 10:30 PM2024-07-24T22:30:34+5:302024-07-24T22:30:53+5:30
Thane News: मीरारोड येथील सरकारी जमिनीवर कब्जा करून त्यावर ६० वाणिज्य आणि निवासी वापरासाठी कच्ची बांधकामे भाड्याने दिल्या प्रकरणी तलाठी यांच्या फिर्यादी वरून मीरारोड पोलीस ठाण्यात शैलेश केसरीनाथ पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मीरारोड - मीरारोड येथील सरकारी जमिनीवर कब्जा करून त्यावर ६० वाणिज्य आणि निवासी वापरासाठी कच्ची बांधकामे भाड्याने दिल्या प्रकरणी तलाठी यांच्या फिर्यादी वरून मीरारोड पोलीस ठाण्यात शैलेश केसरीनाथ पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मीरारोडच्या कनकीया येथील गौरव सिटी कॉम्प्लेक्स , एव्हरशाईन वुड्स समोर मौजे नवघर सर्वे क्र ११४ हि सुमारे एक एकर १८ गुंठे सरकारी जमीन आहे . सदर जमीन शासनाची असल्याचे माहित असून सुद्धा त्याठिकाणी शैलेश पाटील याने कब्जा करून त्यावर सुमारे ६० जणांना कच्ची वाणिज्य आणि निवासी बांधकामे करून देऊन त्याचे भाडे घेत असल्याची तक्रार अजय धोका यांनी केली होती . भूमाफिया पाटील वर एमपीडीए सह विविध कलमां खाली गुन्हा दाखल करून सर्व बांधकामे काढून टाकून भारणीचा दंड व वसूल भाड्याची रक्कम दंडासह वसूल करा असे धोका यांचे म्हणणे होते . सदर बेकायदा कच्च्या बांधकामांना पालिकेच्या प्रभाग अधिकारी यांनी सुद्धा संरक्षण दिल्याचा आरोप धोका यांनी केला होता .
विशेष म्हणजे २०२२ सालीच तलाठी कार्यालयाने सदर सरकारी जागेवर अतिक्रमण केले गेल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला होता . धोका यांनी पाठपुरावा केल्या नंतर तलाठी नितीन पिंगळे यांनी पुन्हा सविस्तर अहवाल सादर केला होता . अखेर वरिष्ठांनी लेखी पत्र दिल्या नंतर मंगळवार २३ जुलै रोजी पिंगळे यांच्या फिर्यादी वरून मीरारोड पोलीस ठाण्यात शैलेश केसरीनाथ पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत .