Thane: अखेर मीरा भाईंदर मधील पहिले कॅशलेस रुग्णालय शुक्रवारपासून होणार सुरू
By धीरज परब | Published: July 18, 2024 07:20 PM2024-07-18T19:20:13+5:302024-07-18T19:20:43+5:30
Mira Bhayander News: मीरा रोड शहरातील पहिल्या मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस रुग्णालयास अखेर शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची मंजुरी मिळाली असून शुक्रवार १९ जुलै पासून हे कॅशलेस आणि झिरो बिलिंग रुग्णालय सुरु होणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली .
मीरा रोड - शहरातील पहिल्या मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस रुग्णालयास अखेर शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची मंजुरी मिळाली असून शुक्रवार १९ जुलै पासून हे कॅशलेस आणि झिरो बिलिंग रुग्णालय सुरु होणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली .
शहरात कॅशलेस आणि गंभीर आजारांचे उपचार तसेच शस्त्रक्रिया नागरिकांवर मोफत व्हाव्यात ह्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी शासन व पालिके कडे पाठपुरावा करून काशीमीरा येथील लता मंगेशकर नाट्यगृह मागे विकासका कडून टीडीआरच्या माध्यमातून ४ मजली इमारत बांधून कॅशलेस रुग्णालयास मंजुरी मिळवली .
या रुग्णालयातील यंत्र साहित्य , उपकरणे खरेदीसाठी शासना कडून २५ कोटी रुपयांचा निधी आ . सरनाईक यांनी मंजूर करून आणला . पालिकेचा एकही पैसा खर्च न करता उभारलेल्या ह्या १०० खाटांच्या रुग्णालयात आयसीयू, पोस्ट ऑपरेटिव्ह आयसीयू, एसी जनरल बेड आणि कॅज्युअल्टी बेड आदी सुविधा असलेल्या रुग्णालयाचे उदघाटन
१४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते.
हृदयरोग , न्यूरो , स्त्रीरोग , कर्करोग , ऑर्थो सह अन्य उपचार व शस्त्रक्रिया ह्या योजने अंतर्गत पिवळ्या आणि केशरी सह आता पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिका धारकांसाठी मोफत असणार आहेत . शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हे कॅशलेस रुग्णालय चालवले जाणार असल्याने शासना कडून योजनेच्या मंजुरीची आवश्यकता होती.
सदर ठिकाणी रुग्णालय होणार हे महापालिकेस एक वर्षां पेक्षा जास्त कालावधी आधी माहिती असताना देखील योजनेच्या मंजुरीचा प्रस्ताव उदघाटना नंतर मार्च महिन्यात विलंबाने पाठवला . प्रस्ताव पाठवण्यास विलंब केल्याने लोकसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या कात्रीत रुग्णालय अडकले . आता आचार संहिता संपल्या नंतर आ . सरनाईक यांनी पाठपुरावा करून शासना कडून योजना मंजुरी मिळवून दिली आहे.
मुळात रुग्णालय सुरु करण्याच्या प्रक्रिये पासूनच जर पालिकेने शासना कडे प्रस्ताव पाठवला असता तर महात्मा फुले योजने अंतर्गत उपचार करण्यास मंजुरी मिळून नागरिकांसाठी सदर रुग्णालय हे खुले झाले असते . पण आता योजनेच्या मंजुरी नंतर शुक्रवार १९ जुलै पासून हे रुग्णालय नागरिकांसाठी खुले होत आहे .
या रुग्णालयात सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी ओपीडी , रक्त तपासणी, हेमॅटोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री टेस्ट, ईसीजी, सोनोग्राफी, २ डी इको टेस्ट, होल्टर, पीएफटी, एक्स-रे, केयूव्ही, सीटी स्कॅन स्क्रीनिंग मोफत होईल. सामान्य शस्त्रक्रिया जसे की अॅपेन्डेक्टॉमी, हर्निया, कोलेसिस्टेक्टोमी, मूळव्याध, फिस्टुला आणि इतर लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया येथे केल्या जातील. ऑर्थो शस्त्रक्रिया जसे की फ्रॅक्चर, आर्थ्रोस्कोपी, सांधे बदलणे याही येथे होतील.
कार्डिओलॉजी आणि कार्डियाक सर्जरी जसे की अँजिओप्लास्टी, बायपास हार्ट सर्जरी, व्हॉल्व्ह बदलणे आणि पेसमेकर या सर्जरी व उपचार येथे होणार आहेत. यूरो शस्त्रक्रिया , न्यूरो सर्जरी , स्त्रीरोग शस्त्रक्रिया , कर्करोग आदी. सारख्या ऑन्को शस्त्रक्रिया येथे होतील अशी माहिती डॉक्टर यांनी दिली.
वैद्यकीय व्यवस्थापन जसे की क्रिटिकल केअर, आयसीयू , थ्रोम्बोलिसिस, आयएबीपी दाखल करणे, विष प्रकरणे, साप चावणे यावरही उपचार होणार आहेत. रूग्णांसाठी वरील सर्व अंतर्गत सेवा देत असतानाच डिस्चार्ज झाल्यानंतर ड्रेसिंग, डॉक्टरांचा सल्ला आणि निदानासह उपचार मोफत केले जातील. पेशंट बरा होऊन घरी गेल्यानंतर १० ते १५ दिवसांनी पुन्हा फॉलोउप तपासणी व पुढील उपचारही त्याला मोफत मिळतील अशी माहिती आ. प्रताप सरनाईक यांनी दिली.