ठाण्यात फायनान्स कंपनीच्या वाहनांचा अपहार करुन परस्पर विक्री करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 09:59 PM2019-07-10T21:59:02+5:302019-07-10T22:04:13+5:30
ठाण्याच्या ‘साई पॉईन्ट’ या वाहनांसाठी कर्ज पुरवठा करणा-या कंपनीच्या थकबाकीदारांच्या दुचाकी परस्पर एका गोदामात ठेवून नंतर त्यांची विक्री करणा-या कंपनीचाच वसूली अधिकारी दीपक रावत आणि त्याचा साथीदार अजगर खान या दोघांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा लाख २५ हजारांच्या १७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
ठाणे: वाहन खरेदीसाठी कर्ज पुरवठा करणा-या ठाण्यातील एका वित्तीय संस्थेच्या थकबाकीदारांच्या वाहनांची परस्पर विक्री करणा-या दीपक रावत (३७, रा. मालाड, मुंबई) आणि अजगर खान (२८, रा. शांतीनगर, भिवंडी) या दोघांना नौपाडा पोलिसांनी मोठया कौशल्याने अटक केली आहे.
ठाण्याच्या पाचपाखाडीतील ‘साई पॉईन्ट’ या वाहनांना कर्ज पुरवठा करणा-या कंपनीतून बरीच वाहने बेपत्ता असल्याची तक्रार या कंपनीने नौपाडा पोलिसांकडे दोन महिन्यांपूर्वी केली होती. याच कंपनीचा मुख्य वसूली अधिकारी म्हणून काम करणारा दिपकसिंग रावत यानेच अजगर खान या दलालाच्या मदतीने कर्ज थकबाकीदारांची वाहने परस्पर आणून ती कंपनीत न ठेवता आपल्याच गोदामात ठेवली. नंतर त्यांची त्याने विक्रीही केली. अशाच विक्री केलेल्या वाहनांपैकी एकाच्या मालकाने मोटारसायकलची आरटीओ कार्यालयात नोंदणीसाठी लागणारा ना हरकत दाखला (एनओसी) साई पॉर्इंट कंपनीकडे मागणी केला. परंतू, त्या दुचाकीच्या विक्रीची नोंदच या कंपनीत नव्हती. शिवाय, ती या कंपनीत उपलब्धही नव्हती. त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापक जयप्रकाश तिवारी यांनी इतरही वाहनांची चौकशी केली. तेंव्हा अनेक वाहने बेपत्ता असल्याचे आढळले. तेंव्हा याप्रकरणी चौकशीचा अर्ज दोन महिन्यांपूर्वी नौपाडा पोलीस ठाण्यात या कंपनीने केला. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी या अर्जाची चौकशी केल्यानंतर हे रॅकेट उघड झाले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, निरीक्षक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश कवळे आणि पोलीस हवालदार अहिरे आदींच्या पथकाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. तेंव्हा साई पॉर्इंटचा कर्मचारी रावत यानेच एका दलाला हाताशी धरुन अनेक वाहनांचा अपहार करुन त्यांची ५० हजार ते सव्वा लाखांच्या किंमतीमध्ये विक्री केल्याचे आढळले. हा प्रकार तिवारी आणि कंपनीच्या मालकाच्या परस्पर झाल्याने त्यांनाही या प्रकाराची माहिती नव्हती. ज्या दुचाकीच्या मालकांनी कर्ज थकीत केले आहे, त्यांची वाहने ताब्यात घेऊन ती कंपनीच्या काल्हेर, भिवंडीतील गोदामात जमा करण्याचे काम रावतकडे होते. ही वाहने जमा केल्यानंतर त्याची मेलद्वारे माहिती देण्याचे कामही त्याच्याकडे होते. याचाच फायदा घेऊन रावत याने अजगर या दलालाच्या मदतीने हप्ते न भरलेल्या मोटारसायकली उचलून त्याची कंपनीला कोणतीही माहिती न देता त्यांची परस्पर विक्री केली. विक्री केलेल्या वाहनांची रक्कम कंपनीच्या कर्ज खात्यामध्ये जमा करणे आवश्यक असतांनाही तिचा त्यांनी अपहार केला. हा प्रकार उघड होताच याप्रकरणी ६ जुलै रोजी कंपनीने नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल होताच ७ जुलै रोजी दिपक रावत (३७, रा. मालाड, मुंबई) आणि अजगर खान (२८, रा. शांतीनगर, भिवंडी) या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांनी चोरी करुन परस्पर विक्री केलेल्या सहा लाख २५ हजारांच्या १७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांनाही सुरुवातीला १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यांची कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना १५ जुलैपर्यंत पोलीस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.