पहिल्याच सामन्यात पावसाची ‘सेंच्युरी’, रेल्वे कूर्मगतीने, वीजपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 01:24 AM2019-06-29T01:24:36+5:302019-06-29T01:24:48+5:30

महिनाभर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या ठाणेकरांना पहिल्याच सामन्यात पावसाने सेंच्युरी (१५०.८८ मिमी) ठोकून सुखद धक्का दिला.

Thane : In the first match, the 'Century' of the rain | पहिल्याच सामन्यात पावसाची ‘सेंच्युरी’, रेल्वे कूर्मगतीने, वीजपुरवठा बंद

पहिल्याच सामन्यात पावसाची ‘सेंच्युरी’, रेल्वे कूर्मगतीने, वीजपुरवठा बंद

Next

ठाणे/उल्हासनगर - महिनाभर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या ठाणेकरांना पहिल्याच सामन्यात पावसाने सेंच्युरी (१५०.८८ मिमी) ठोकून सुखद धक्का दिला. एकीकडे पावसाच्या आगमनामुळे सर्वसामान्य सुखावले असताना, दुसरीकडे संततधार पावसाने उल्हासनगरातील नालेसफाईची पोलखोल होऊन फर्निचर मार्केटमधील नाला तुंबल्याने दुथडी भरून वाहू लागला आणि फर्निचर मार्केटला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. नाल्यातील पाणी अनेक दुकानांत शिरल्याने लाखो रुपयांच्या फर्निचरचे नुकसान झाले. खबरदारी म्हणून परिसरातील विद्युतपुरवठा खंडित केल्याने १८०० घरांमधील नागरिकांना अंधारात राहावे लागले. सेंच्युरी शाळेजवळ वीज पडून गजेंद्र गोद्रा हा जखमी झाला.

रस्ते व पुलांच्या अर्धवट अवस्थेत राहिलेल्या कामांमुळे मुरबाड व शहापूर तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर पाणी साचून १५ गावे आणि २० आदिवासीवाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला. तर, ठाणे शहरात १२, तर कल्याण-डोंबिवली परिसरात १३ वृक्ष उन्मळून पडले. पहाटेपासून पावसाने जोर धरल्याने मध्य रेल्वेची उपनगरी वाहतूक सकाळपासून १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होती. परिणामी, सकाळी व सायंकाळी गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल झाले.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा बोजवारा उडण्याचे भाकीत सोशल मीडियावर नागरिकांनी व्यक्त केले होते. त्याचे प्रत्यंतर शुक्रवारी पावसाने नाले व गटारे ओव्हरफ्लो होऊन फर्निचर मार्केट बुडाल्याने आले. तेथून वाहणारा नाला रात्री तुंबल्याने, त्यातील पाणी रस्त्यावरून वाहू लागले. फर्निचर मार्केट व कॅम्प नं.-१ परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवला. मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी जेसीबीद्वारे नाल्यावरील स्लॅब तोडून नाल्याचा मार्ग मोकळा केल्यानंतर फर्निचर मार्केटमधील पाण्याचा निचरा झाला. फर्निचर मार्केटसह, गुलशननगर, कॅम्प नं.-३, स्टेट बँकेसमोरील मुख्य रस्ता, मयूर हॉटेल, शहाड स्टेशन परिसर यांच्यासह अनेक भागांत पाणी साचून तलावाचे स्वरूप आले होते. सेंच्युरी शाळेची संरक्षक भिंत पडली असून तेथील एका झाडावर वीज पडून झाडाखाली उभा असलेला गजेंद्र गोद्रा हा जखमी झाला. त्याच्यावर सेंच्युरी कंपनीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


शहापूर-मुरबाड वाहतूक ठप्प


शेणवा/किन्हवली : रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या शहापूर-मुरबाड रस्त्याच्या रु ंदीकरण व नूतनीकरणाचे काम करणाºया कंत्राटदार कंपनीने अक्षम्य बेपर्वाई करत रस्त्याचे काम कूर्मगतीने सुरू ठेवल्याने रस्त्यांची अनेक कामे रखडली व परिणामी शुक्रवारी मुरबाड-शहापूर या तालुक्यांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने १५ गावे व २० आदिवासी वस्त्यावाड्यांचा संपर्क तुटला. शुक्र वारी मुसळधार पावसात सर्वत्र खोदून ठेवलेला व पर्यायी तयार केलेला रस्ता पाण्याखाली गेला.

ंच्परिणामी, वाहतुकीसाठी मार्ग बंद केला. संपूर्ण रस्त्यावर चिखल व पाणीचपाणी झाल्याने या मार्गावरील वाहतूकसेवा ठप्प झाली. त्यामुळे १५ गावे व २० आदिवासी वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटला. परिसरातील नडगाव ,गोकुलगाव, लेनाड बु, लेनाड खु, भटपाडा, नेहरोली, जांभा, शेंद्रूण, ठिले, टेंभरे, कलगाव, दहिवली, भागदल, अल्यानी, चिंचवली, गेगाव आणि नांदवल या गावांतील चाकरमानी, विद्यार्थी, दूधविक्रेते, मजूर यांना वाहतूक ठप्प झाल्याने शहापूर शहराकडे येता आले नाही. शेकडो वाहने अडकून पडली.

वालधुनी नदीपात्रातील अवैध बांधकामांनी आला पूर
संततधार पाऊस आणि वालधुनी नदीपात्रातील अवैध बांधकामांमुळे उल्हासनगरला पुराचा फटका बसल्याची चर्चा आहे. येथील बंद असलेल्या हरमन मोहता कंपनीच्या जागेतील नाल्याचा प्रवाह अवैध बांधकाम करणाऱ्यांनी बदलून नाला अरुंद केल्याने, शेजारील झोपडपट्टीत पाणी घुसल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

केडीएमसी हद्दीत १३ झाडे पडली

कल्याण/डोंबिवली : पावसामुळे केडीएमसी हद्दीत १३ झाडे आणि विजेचा एक खांब पडला. कल्याण पूर्वेतील कर्पेवाडीतील तीन मजली नायर इमारतीच्या जिन्याचा भाग पावसामुळे कोसळला. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने केडीएमसीचा नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. तसेच पूर्वेतील लोकग्रामचा नवा रस्ता शुक्रवारी खचल्याने त्यात ओंकार शाळेच्या बसचे चाक रुतले. मात्र, बसमध्ये विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळला. कल्याण-आग्रा रोडवरील ‘जय हरी’ ही अतिधोकादायक इमारत भरपावसात जमीनदोस्त करण्याचे काम करण्यात आले. टिटवाळा, बल्याणी परिसरातील चाळींमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

Web Title: Thane : In the first match, the 'Century' of the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.