ठाणे : आधी जनजागृती करा मगच कचरा उचलणे बंद करा, महापौरांचे प्रशासनाला आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 02:39 AM2017-12-22T02:39:20+5:302017-12-22T02:39:59+5:30
ज्या सोसायटी, हॉटेल, मॉल, रुग्णालयांसह इतर आस्थापनांचा दिवसाचा कचरा हा १०० किलोग्रॅम पेक्षा जास्त निर्माण होत असेल, तसेच ज्या सोसायट्या पाच हजार चौ. मीटरच्या क्षेत्रात वसल्या असतील त्यांनी त्यांच्या कच-याचे वर्गीकरण करून त्याच ठिकाणी कच-याची विल्हेवाट लावावी, अशा आशयाच्या नोटिसा पालिकेने बजावण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे : ज्या सोसायटी, हॉटेल, मॉल, रुग्णालयांसह इतर आस्थापनांचा दिवसाचा कचरा हा १०० किलोग्रॅम पेक्षा जास्त निर्माण होत असेल, तसेच ज्या सोसायट्या पाच हजार चौ. मीटरच्या क्षेत्रात वसल्या असतील त्यांनी त्यांच्या कच-याचे वर्गीकरण करून त्याच ठिकाणी कच-याची विल्हेवाट लावावी, अशा आशयाच्या नोटिसा पालिकेने बजावण्यास सुरुवात केली आहे. तसेच जे कच-याची विल्हेवाट लावणार नाहीत, त्यांचा कचरा उललला जाणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. त्यानुसार पालिकेच्या डेडलाईननंतर काही सोसायट्यांचा कचरा उचलणे बंद केल्याचा मुद्दा बुधवारच्या महासभेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. आधी सोसायट्यांना कचºयाची विल्हेवाट लावण्याचे प्रशिक्षण द्यावे त्यानंतरच कचरा उचलणे बंद करावे अशी मागणीही सदस्यांनी केली. त्यानुसार महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आधी जनजागृती, प्रशिक्षण द्या मगच कचरा उचलणे बंद करा, तोपर्यंत कचरा उचलण्याची प्रक्रिया सुरूच ठेवावी असे आदेश संबंधितांना दिले.
महासभेत भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी या मुद्याला हात घालून पालिकेने पाठविलेली नोटिस सभागृहाला सादर केली. परंतु, काही सोसायट्या छोट्या असल्याने त्यांना कचºयाची विल्हेवाट लावता येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नोटिस बजावण्यापूर्वी कचºयाची विल्हेवाट लावण्याचे प्रशिक्षण, जनजागृती करणे अपेक्षित होते, असा मुद्दा त्यांनी मांडला. त्याच अनुषंगाने इतर सदस्यांनीदेखील स्वच्छ शहर म्हणून पालिका दावा करीत असली तरी केंद्राने केलेल्या सर्व्हेत आपण १७ वरुन ११६ क्रमांकावर कसे गेलो असा सवाल नारायण पवार यांनी केला. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करून दिला जात असला तरी तो घंटागाडीत एकत्रीतच टाकला जात असल्याचे महापौर मीनाक्षी शिंदे यांनी निदर्शनास आणले. महापालिकेला अद्यापही स्वत:चे हक्काचे डंपींग ग्राउंड मिळविता आलेले नाही, असे असतांना ठाणेकरांवर ही कुºहाड कशासाठी असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, आपला प्रभाग स्वच्छ राखणाºया टॉप टेन नगरसेवकांना प्रत्येकी अतिरिक्त २५ लाखांचा निधी देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. परंतु, ज्या भागात सोसायटी आहेत, त्यांनाच ते मिळणार आहेत, आमच्या सारख्या झोपडपट्टी भागाला या टॉप टेनमध्ये संधी असणार का? असा प्रश्न राष्टÑवादीच्या हणमंत जगदाळे यांनी केला. एकूणच आधी जनजागृती, प्रशिक्षण, कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी कशा प्रकारच्या यंत्रणा आहेत, याची माहिती प्रदर्शन भरविण्यात यावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली. प्रशासनाने कोणत्याही सोसायटीचा कचरा उचलणे बंद केले नसल्याचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील महिन्यात या संदर्भातील प्रदर्शन लावण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.