ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्यामुळे आपत्ती नियंत्रण जलद होईल', आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन

By अजित मांडके | Published: May 17, 2024 04:57 PM2024-05-17T16:57:50+5:302024-05-17T17:00:13+5:30

आराखड्याची प्राथमिक रुपरेषा झाली सादर.

thane flood risk control action plan will expedite disaster control asserted commissioner saurabh rao | ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्यामुळे आपत्ती नियंत्रण जलद होईल', आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन

ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्यामुळे आपत्ती नियंत्रण जलद होईल', आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन

अजित मांडके, ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येणार असेल तर त्याची आगाऊ सूचना नागरिकांना मिळावी, यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या प्रकारच्या यंत्रणेची आवश्यकता या प्राथमिक कृती आराखड्यामुळे अधोरेखित झाली आहे. एखाद्या आपत्तीचा इशारा मिळाल्यानंतर त्याच्याशी निगडित यंत्रणांनी कशाप्रकारे जलद गतीने त्या आपत्तीचा सामना करावा, त्याचे अपेक्षित परिणाम काय आहेत, याची एक प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यास ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्याची मदत होईल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. 

ठाणे महापालिका क्षेत्रात अतिवृष्टीच्या काळात साचणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या पूर स्थितीचा धोका नियंत्रणात आणण्यासाठी ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्याची प्राथमिक रुपरेषा गुरूवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना सादर करण्यात आली.

अतिवृष्टीच्या काळात सखल भागात साठणारे पाणी, भरतीच्या काळात असताना पावसाच्या पाण्याला खाडीत जाण्यापासून होणारा अडथळा, महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जल वाहिन्यांचे जाळे, नाल्यातील कचऱ्याचा उपद्रव आदींमुळे वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. काही प्रसंगात जीवितहानी होण्याचीही भीती असते. या सर्व स्थितीचा अभ्यास करून ही पूर सदृश स्थिती कशी हाताळायची, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेसाठी कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हार्यन्मेंट अॅण्ड वॉटर (सीईईडब्ल्यू) ही वातावरण बदल क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था या कृती आराखड्याचे काम करत आहेत.

आपत्ती नियंत्रणात प्रत्यक्ष घटनास्थळी काम करणारे कर्मचारी यांचे अद्ययावत प्रशिक्षण आणि नागरिकांमध्ये कमालीची जागरूकता या दोन गोष्टींचाही उहापोह या कृती आराखड्यात करण्यात आला आहे.

नाल्यात पडणारा कचरा ही शहराची मोठी समस्या आहे. हा कचरा रोखण्यासाठी काय आणि कसे उपाय करता येतील, नागरिकांचे प्रबोधन कसे करता येईल, त्यांना कचरा टाकण्यासाठी सोयीचे कोणते पर्याय देता येतील, याचा विचार करून उपाय सुचवण्याची सूचना आयुक्त राव यांनी 'सीईईडब्ल्यू'च्या प्रतिनिधींना केली. 

सहा महिन्यांपासून या कृती आराखड्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर विकास विभाग यांच्याकडून मिळालेल्या माहिती तसेच, आपत्ती व्यवस्थापनबाबतच्या शास्त्रीय संकल्पना आदींची सागंड घालून सीईईडब्ल्यू यांनी प्राथमिक कृती आराखडा तयार केला आहे. त्यात, पूर स्थितीस कारणीभूत घटक, त्यावरील अल्प आणि दीर्घ कालीन उपाय, त्यातून साध्य होणारा परिणाम आणि नागरिकांना त्याचा होणार उपयोग आदींबाबत मुद्द्यांचा समावेश आहे. हा प्राथमिक अहवाल आता महापालिकेच्या संबंधित सर्व विभागांना देण्यात आला असून त्यावर त्यांची मते आणि सूचना जाणून घेण्यात येणार आहेत. सीईईडब्ल्यूचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी नितीन बस्सी आणि विश्वास चितळे यांनी हा अहवालाचे सादरीकरण करून त्याची प्रत आयुक्त राव यांना प्रदान केली.

Web Title: thane flood risk control action plan will expedite disaster control asserted commissioner saurabh rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.