अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; २५ लाखांच्या बनावट खाव्यासह ६ लाखांचे पामतेलाच साठा जप्त
By अजित मांडके | Published: October 22, 2022 02:28 PM2022-10-22T14:28:29+5:302022-10-22T14:29:19+5:30
अशा प्रकारच्या कारवाया भविष्यात देखील केल्या जातील असे संबंधित विभागामार्फत सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कल्याण येथे बनावट खव्याची विक्री करण्यासाठी घेवून जाणाऱ्या वाहनावर ठाणे अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून २५ लाखांचा सुमारे ११ किलो मावा सदृश्य पदार्थाचा तर, रिफाइंड पामतेलाची अन्य तेलाच्या नावाने विक्री करणाऱ्या भिवंडीतील एका दुकानावर कारवाई करीत सहा लाख रुपये किमतीचे ६ हजार ६६७ किलो रिफाइंड पामोलीन तेल जप्त करण्यात आले आहे. तसेच सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्यासह अन्नविषबाधेसारखी अप्रिय घटना घडू नये म्हणून प्रशासनामार्फत नियमितपणे अशा प्रकारच्या कारवाया भविष्यात देखील केल्या जातील असे संबंधित विभागामार्फत सांगण्यात आले.
दिवाळीच्या सणात प्रामुख्याने उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थाचा गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्वसामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यात सणासुदीच्या काळात मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने मात्र त्या प्रमाणात खव्याची उपलब्धता होत नाही. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यात समन्वय साधण्यासाठी व्यापाऱ्याकडून स्वीट, हलवा, बर्फी या नावाने खवा सदृश्य अन्नपदार्थाचे वितरण होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने त्या अनुषंगाने शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी काळा तलाव, कल्याण (पश्चिम) येथे वाहनांमधून २५ लाख ८२ हजार ८१६ किमतीचा १० हजार ९०२ मावा किंवा मावा सदृश्य अन्नपदार्थ यांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
तर, दुसरीकडे भिवंडीतील मेसर्स शेफ शुभ कुकिंग ओईल, घर क्रमांक ५०१, पाटील कंपाऊंड, खदान रोड, फुलेनगर येथील या अन्नस्थापनातून सहा लाख ८१ हजार ९१८ एवढ्या किमतीचे सहा हजार ६६७ किलो रिफाइंड पामोलीन तेल जप्त करण्यात आले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे कोकण विभाग सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या उपस्थितीत कोकण विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री रामलिंग बोडके, माणिक जाधव, राजेंद्र कर्डक, भालचंद्र कुलकर्णी, वानरे तसेच कीर्ती देशमुख यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"