ठाणे वनविभाने मुंबईतून जप्त केली २६ कोटींची व्हेलची उलटी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 11:43 PM2021-07-12T23:43:08+5:302021-07-12T23:46:52+5:30
ठाणे वनविभाग आणि मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट दहाच्या पथकाने संयुक्तपणे मुंबई उपनगरातील अंधेरी आणि मालाड येथील कारवाईमध्ये व्हेल माशांच्या उलटीची तस्करी करणाऱ्या राजेश मिस्त्री याच्यासह पाच जणांना नुकतीच अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणेवनविभाग आणि मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट दहाच्या पथकाने संयुक्तपणे मुंबई उपनगरातील अंधेरी आणि मालाड येथील कारवाईमध्ये व्हेल माशांच्या उलटीची तस्करी करणाऱ्या राजेश मिस्त्री याच्यासह पाच जणांना नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून २६ कोटींची उलटी जप्त केली आहे.
या व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीसाठी काही जण मालाड आणि अंधेरी येथे येणार असल्याची माहिती ठाणे वन विभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे उप वनसंरक्षक गजेंद्र हिरे, सहायक वनसंरक्षक गिरीजा देसाई यांच्या
मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक, वन अधिकारी प्रशांत देशमुख, शहापूरचे वनपाल रवींद्र तवर, नारायण माने, गणेश परहर आणि रामा भांगरे आदींच्या पथकाने १० जुलै २०२१ रोजी मालाड येथून राजेश मिस्त्री, दिवाकर शेट्टी, दादाभाई घनवट आणि किरीटभाई वडवाना यांना सुमारे आठ किलोच्या उलटीसह अटक केली. तर दुसºया कारवाईमध्ये सईद सिंबगथुल्ला (रा. कर्नाटक) याला १८ किलो ग्रॅम व्हेल माशाची विक्री करतांना रंगेहाथ पकडले. या पाचही जणांना दोन दिवसांची वनकोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
* व्हेल माशाची उलटी अतिशय दुर्मिळ मानली जाते. भारतीय बाजारपेठेत एक किलो उलटीची किंमत एक कोटी रु पये असल्याचे सांगितले जाते. तर आखाती देशात विशेष करून दुबई, इंग्लंड आणि अमेरिका या देशांमध्ये व्हेल माशाच्या उलटीला मोठी मागणी आहे. आंतरराष्टÑीय बाजारपेठेमध्ये एक किलो उलटीची किंमत तीन ते पाच कोटींपर्यंत सांगितली जाते.
* विशेष म्हणजे व्हेल माशाची ही उलटी समुद्राच्या पाण्यात बुडत नसून समुद्रातील क्षारामुळे ती खाºया पाण्यावर तरंगते आणि गोळा होऊन वर्षभराचा प्रवास करून समुद्रकिनाºयावर येते.
*यासाठी होते तस्करी...
या माशाच्या उलटीचा वापर उच्च प्रतीचा परफ्युम तयार करण्यासाठी तसेच काही ठिकाणी औषध निर्मितीमध्ये होतो. काही ठिकाणी सिगारेट , मद्य आणि खाद्य पदार्थामध्ये स्वाद वाढविण्यासाठी देखील केला जातो. याची खरेदी विक्र ी करणे हे वन्य प्राणी सुरक्षा अधिनियम अंतर्गत बेकायदेशीर आहे. तरीही त्याची मोठया प्रमाणात तस्करी केली जाते, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.