Thane: ननावरे पती-पत्नी आत्महत्या प्रकरणी शिवसेना आमदारांच्या स्वीय सहायक साठेसह चौघांना अटक
By सदानंद नाईक | Published: August 19, 2023 07:33 PM2023-08-19T19:33:32+5:302023-08-19T19:37:35+5:30
Ulhasnagar: नंदू ननावरे पतीपत्नी आत्महत्येला तीन आठवड्याचा कालावधी उलटूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ भाऊ धनंजय ननावरे यांनी हाताचे बोट कापून गृहमंत्र्यांना भेट देणार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यावर, पोलीस कामाला लागून मूळ एफआरआय मध्ये नाव नसलेल्या शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांच्या स्वीयसहायक शशिकांत साठे यांच्यासह चौघांना अटक केली.
- सदानंद नाईक
उल्हासनगर - नंदू ननावरे पतीपत्नी आत्महत्येला तीन आठवड्याचा कालावधी उलटूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ भाऊ धनंजय ननावरे यांनी हाताचे बोट कापून गृहमंत्र्यांना भेट देणार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यावर, पोलीस कामाला लागून मूळ एफआरआय मध्ये नाव नसलेल्या शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांच्या स्वीयसहायक शशिकांत साठे यांच्यासह चौघांना अटक केली.
उल्हासनगर कॅम्प नं-४, आशेळेपाडा येथे राहणारे नंदू ननावरे यांनी माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीयसहायक म्हणून काम केले. तसेच माजी आमदार पप्पु कलानी व शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांचे मंत्रालयातील कामे करीत होते. असे बोलले जाते. १ ऑगस्ट रोजी दुपारी पत्नीसह राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून ननावरे यांनी उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी पतीपत्नीने एक व्हिडिओ काढून विशिष्ठ नागरिकांना पाठविला. त्यामध्ये आत्महत्यास रणजितसिंह नाईक निंबाळकर, संग्राम निकाळजे व दोघा देशमुख वकील बंधूंचा उल्लेख आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात या चौघावर गुन्हा दाखल झाला आहे.
ननावरे पतीपत्नीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर, नातेवाईक व भाऊ धनंजय समोर घराची झाडाझडती घेतली असता, व्हिडीओ व्हायरल झाल्याचा पेन ड्राइव्ह व एक चिट्टी मिळाली होती. आरोपीवर कारवाई संदर्भात धनंजय ननावरे यांच्यासह नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या चकरा मारूनही कोणतीच कारवाई झाली नाही. दरम्यान गुन्हा खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग केला. आरोपीवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ भाऊ धनंजय ननावरे याने हाताचे बोट कापले. असे शरीराचे अवयव दर आठवड्याला कापून गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना दान देणार असल्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याने, एकच खळबळ उडाली. खंडणी विरोधीन पथकाने, शुक्रवारी रात्री चिट्टीत नाव असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार किणीकर यांचे स्वीयसहायक शशिकांत साठे, पप्पु कलानी यांचे कट्टर समर्थक कमलेश निकम, नरेश गायकवाड व गणपती कांबळे यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २४ आगस्ट पर्यन्त पोलीस कस्टडी दिल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख मालोजी शिंदे यांनी दिली आहे.
२८ ऑगस्ट पर्यंत बेलवर?
ननावरे आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या रणजितसिंग नाईक निंबाळकर, देशमुख बंधू व संग्राम निकाळजे यांनी २८ ऑगस्ट प्रयत्न न्यायालयातून अटकपूर्व बेल आणल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती दिली. ती रद्द केल्यानंतर कारवाईचे संकेत दिले.