ठाणे : सहाय्यक आयुक्त महेश आहेर मारहाण प्रकरणी चौघांना अटक, पोलीस कोठडीत रवानगी
By जितेंद्र कालेकर | Published: February 16, 2023 10:33 PM2023-02-16T22:33:14+5:302023-02-16T22:33:49+5:30
नौपाडा पोलिसांची कारवाई, चौघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी
ठाणे : ठाणे महापालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत वाणी, अभिजित पवार, विक्रम खामकर आणि विशंत गायकवाड या चौघांना गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली. चौघांनाही एक दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
आहेर हे १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:४५च्या सुमारास ठाणे महापालिकेच्या गेट क्रमांक चारजवळ मोबाइवर बोलत उभे होते. त्याचवेळी तिथे आलेले अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांच्या गटाने आहेर यांच्यावर हल्ला केला होता. या चौघांनाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या पथकाने गुरुवारी पहाटे अटक केली. त्यानंतर त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले.
त्यांच्याकडून हत्यार जप्त करणे, हल्ला करण्यामागील कारणांचा तपास करणे तसेच त्यांच्या साथीदारांचाही शोध घेण्यासाठी आरोपींना सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली. सर्व बाजू ऐकल्यानंतर ठाणे न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. इतर आरोपींचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आहेर यांच्यावर गुन्हा दाखल करा
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना संपविण्याबाबतची कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर आहेर यांच्यावर कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे आता आहेर यांच्यावर कारवाई होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे आणि राहुल पिंगळे यांनी सांगितले की, बुधवारी झालेल्या मारहाण प्रकरणाचे आम्ही समर्थन करणार नाही, परंतु ही मारहाण का झाली? याचाही परामर्श घेणे गरजेचे आहे. महेश आहेर यांच्यावर अनधिकृत बांधकाम, सार्वजनिक मालमत्ता, धमकावणे असे विविध आरोप होत आहेत. त्यांची विभागीय चौकशी सुरू असताना ते त्याच विभागाचा कार्यभार सांभाळत आहेत. कोणाच्या आशीर्वादाने त्यांच्याकडे या विभागाचा कार्यभार देण्यात आला, असा सवालही या वेळी शिंदे आणि पिंगळे यांनी उपस्थित केला आहे.
वर्षापूर्वीही ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महेश आहेर यांच्यामार्फत घाटकोपर येथे बोलावून धमकावण्यात आल्याचा आरोप केला होता. त्याची तक्रारही पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती, मात्र वर्षभरानंतरही आहेर यांची साधी चौकशीही होत नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. एका आमदाराच्या मुलीला मारण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे महापालिकेतील या गुंड अधिकाऱ्याची एसआयटीमार्फत चौकशी होईल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.