Thane: महेश आहेर मारहाण प्रकरणी चौघांना अटक, काल संध्याकाळी झाली होती मारहाण
By जितेंद्र कालेकर | Published: February 16, 2023 02:57 PM2023-02-16T14:57:42+5:302023-02-16T14:58:41+5:30
Thane: महापालिका अधिकारी महेश आहेर मारहाण प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला होता.
ठाणे - महापालिका अधिकारी महेश आहेर मारहाण प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हेमंत वाणी, अभिजित पवार, विक्रम खामकर आणि विशंत गायकवाड या चौघाना गुरुवारी पहाटेच्या सुमारास नौपाडा पोलिसांनी अटक केली. ठाणे न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
महेश आहेर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे आदी गंभीर कलमांखाली बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. आहेर यांच्यावर अभिजित पवार,विक्रम खामकर आणि हेमंत वाणी आदींनी ठाणे महापालिकेच्या आवारात बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास ते ठाणे महापालिका गेट क्रमांक चार येथे मोबाईलवर बोलत असतांना ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला होता.
आपल्या तक्रारीमध्ये आहेर यांनी म्हटले होते की, त्यांनी विक्रम खामकर यांच्याविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्हयाचा आणि आणि आव्हाड यांच्या मतदारसंघात बेकायदा बांधकाम तोडल्याचा तसेच त्यांचे न ऐकल्याचा राग मनात धरुन अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि इतर तिघांनी त्यांच्याजवळ येत आव्हाड यांनी तुला संपवायला सांगितल्याचे सांगत बंदूक आणि चॉपरने वार करण्याच्या उद्देशाने आहेर यांना मारहाण केली. त्यांचे अंगरक्षक आल्यानंतर मात्र तिथून पळ काढला. जातांना तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली. या घटनेनंतर जिल्हा शासकीय रुग्णालतया उपचारासाठी दाखल केलेल्या आहेर यांनी नौापाडा पोलिसांकडे ही तक्रार दिली होती.