Thane: गरबा कार्यक्रमाच्या बनावट प्रवेशिका विकून ६९ हजारांची फसवणूक, एकास अटक
By जितेंद्र कालेकर | Published: October 23, 2023 10:13 PM2023-10-23T22:13:19+5:302023-10-23T22:15:41+5:30
Thane: रासरंग गरबा या कार्यक्रमाची सातशे रुपयांची बनावट प्रवेशिका बनवून ९९ प्रवेशिकांची विक्री करीत ६९ हजार ३०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या निमित्त अशोक ठक्कर (२३, रा. डोंबिवली) याला अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी दिली.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - वागळे इस्टेट येथील एमसीएचआयच्या वतीने आयोजित केलेल्या रासरंग गरबा या कार्यक्रमाची सातशे रुपयांची बनावट प्रवेशिका बनवून ९९ प्रवेशिकांची विक्री करीत ६९ हजार ३०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या निमित्त अशोक ठक्कर (२३, रा. डोंबिवली) याला अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी दिली. त्याला २५ ऑक्टाेबरपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठक्कर याच्या दुसऱ्या साथीदाराचाही शोध घेण्यात येत आहे. एमसीएचआयच्या वतीने वागळे इस्टेट ओडीसी आयटी पार्क रोड क्रमांक नऊ येथे रासरंग गरबा या कार्यक्रमाचे १५ ऑक्टाेबरपासून आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी एमसीएचआयच्या वतीने सातशे रुपयांची प्रवेशिकाही ठेवली आहे. या प्रवेशिकांवर अनुक्रमांकासह स्टॅम्पही मारण्यात आले आहेत. २१ ऑक्टाेबर रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी ७ वाजता मॉडेला मिल कंपाउंड या ठिकाणी आयोजित रासरंग गरबा या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांंची विक्री होत असताना रात्री ८:१५ वाजण्याच्या सुमारास एका महिलेकडे हुबेहूब बनावट प्रवेशिका आढळून आली. ही प्रवेशिका एमसीएचआय या बिल्डर असोसिएशनने छपाई केलेल्या प्रवेशिकांप्रमाणेच होती. मात्र, त्यावरील अनुक्रमांक हा संगणकावर छापलेला आढळला. मुलुंड भागात राहणाऱ्या या महिलेला निमित्त ठक्कर याने या प्रवेशिका विक्री केल्याची माहिती तिने दिली.
अशाच प्रवेशिका बाहेर विक्री करताना या संघटनेचे व्यवस्थापक सुमित गुढका यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निमित्तला पकडून वागळे इस्टेट पोलिसांच्या ताब्यात दिले. सखोल चौकशीत डोंबिवलीच्याच अक्षय दोशी या तरुणाने आपल्याला या प्रवेशिका दिल्याची माहिती त्याने दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ यांच्या पथकाने त्याच्यासह अक्षय याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यामध्ये निमित्तला अटक केली. त्याचा साथीदार अक्षय याचा शोध घेण्यात येत असून, यात आणखी कोणी साथीदार आहेत का? याचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक वैशाली रासकर यांनी सांगितले.