Thane: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ८६ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल
By जितेंद्र कालेकर | Published: July 23, 2024 08:43 PM2024-07-23T20:43:49+5:302024-07-23T20:44:43+5:30
Thane News: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली प्रिया कामत (४२, रा. नौपाडा, ठाणे) या संगणक अभियंता महिलेला ८३ लाख २३ हजारांचा गंडा सायबर भामट्यांनी घातल्याचा प्रकार उघड झाला.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली प्रिया कामत (४२, रा. नौपाडा, ठाणे) या संगणक अभियंता महिलेला ८३ लाख २३ हजारांचा गंडा सायबर भामट्यांनी घातल्याचा प्रकार उघड झाला. माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी मंगळवारी दिली.
एका खासगी कंपनीमध्ये कामत या संगणक अभियंता म्हणून नोकरीला आहेत. त्या नेहमीच शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करीत असतात. त्यांच्या मोबाइलवरील एका व्हॉटसॲप क्रमांकावर १७ मे २०२४ रोजी अविवा इन्व्हेस्टर या व्हॉटसॲप ग्रुपवर त्यांना समाविष्ट केले. यात चार वेगवेगळे मोबाइल क्रमांक ग्रुप ॲडमीनचे होते. ग्रुपमधील सदस्य एकमेकांमध्ये शेअर मार्केटमध्ये कसा फायदा होतो, याचीच चर्चा करीत होते. कामत यांनीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या एका व्हीआयपी व्हॉटसॲप ग्रुपमध्ये त्यांना समाविष्ट करून शेअर मार्केटमध्ये जादा नफा मिळेल, अशी बतावणी केली. २४ मे २०२४ रोजी त्यांनी अविवा मेम्बर-९ या व्हॉटसॲप ग्रुपमध्ये त्यांना एक लिंक पाठवली.
एक ॲपही त्यांना इन्स्टॉल करण्यास सांगितले. याच ग्रुपवर त्यांनी शेअर मार्केटसाठी खाते उघडले. त्यानंतर २४ मे २०२४ ते ४ जुलै २०२४ या कालावधीमध्ये या ॲपवर दिलेल्या विविध बँक खात्यांवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी त्यांनी दोन वेगवेगळ्या बँक खात्यावरून ८६ लाख २३ हजार रुपये भरले. या गुंतवलेल्या पैशांचे मूल्य वाढून २ कोटी ६ लाख ९४ हजार झाल्याचे संबंधित ॲपवर दाखविण्यात आले. शेअरचा भाव वधारल्याने त्यांनी या खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पैसे मिळालेच नाही. त्यानंतर त्यांना टॅक्स भरण्यास सांगण्यात आले. मात्र, जादा परतावा किंवा मुद्दल अशी कोणतीच रक्कम परत मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कामत यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात २१ जुलै २०२४ रोजी गुन्हा दाखल केला. सायबर विभागामार्फत आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.
...........