ठाणे- मुंबईत चोरी करणारी चौघा जणांची टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 12:26 AM2022-01-14T00:26:32+5:302022-01-14T00:34:54+5:30
मुंबई, ठाण्यासह भिवंडी आणि बदलापूरात चोरीचे गुन्हे करुन पसार झालेल्या रवी उर्फ गणु तानाजी धनगर (१९, रा. अटाळी रोड, अंबिवली, कल्याण) याच्यासह चार जणांच्या टोळीला नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी गुरुवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंबई, ठाण्यासह भिवंडी आणि बदलापूरात चोरीचे गुन्हे करुन पसार झालेल्या रवी उर्फ गणु तानाजी धनगर (१९, रा. अटाळी रोड, अंबिवली, कल्याण) याच्यासह चार जणांच्या टोळीला नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी गुरुवारी दिली. या टोळीकडून तीन मोटारसायकलींसह सुमारे दोन लाख १७ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.
नौपाडा परिसरातील अनिल लालवाणी यांच्या कविता मोबाईल या दुकानातून चोरटयांनी १७ डिसेंबर २०२१ पहाटेच्या सुमारास दुकान फोडून काही मोबाईलची चोरी केली होती. त्याचवेळी अमित भोरासकर यांच्या मेडिकल दुकानातूनही ३९ हजारांची रोकड लंपास केली होती. याशिवाय, अन्यही चार ते पाच दुकानांमध्ये त्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर धुमाळ यांच्यासह अविनाश सोंडकर,पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर, आणि रामचंद्र वळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयदिप गोसावी, पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, संगम पाटील, हवालदार महेश भोसले आणि राजेंद्र गायकवाड आदींच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच गेल्या दहा ते पंधरा दिवस तांत्रिक बाबींचे विश्लेषण करुन आरोपींचा माग घेतला. तेंव्हा यातील आरोपी हे शहाड़ नदीवर असल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी सापळा रचून एक किलोमिटर अंतरापर्यंत थरारक पाठलाग करून यातील आरोपी रवी धनगर, राज विजय राजापुरे (२०, रा. कुर्ला, मुंबई) राजकुमार सरोज (२०, उल्हासनगर, मुळ रा जि. इलाहाबाद उत्तरप्रदेश) आणि बालकुष्ण उर्फ कृष्णा गोंविद पाल (२२, रा. अंबरनाथ मुळ राह. मध्यप्रदेश) यांना शिताफिने ८ जानेवारी रोजी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून नौपाडयातील तीन तसेच कल्याण, बदलापूर, भिवंडी, रायगड आणि मुंबईतील असे नऊ चोरीचे गुन्हे उघडकीस आले. त्यांनी या चोरीची कबूलीही दिली. त्यांच्याकडून दोन मोबाईल, तीन मोटारसायकलसह दोन लाख १७ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.