ठाणे : ओळख असल्याचे भासवून वयोवृद्धांना लाखोंचा गंडा घालणारी टोळी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 03:53 PM2018-12-13T15:53:08+5:302018-12-13T15:55:16+5:30
ठाण्यातील वयोवृद्ध नागरिकांना जुनी ओळख असल्याचे भासवून फसवणूक करुन त्यांना लुटणाऱ्या 13 जणांच्या टोळीला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.
ठाणे - ठाण्यातील वयोवृद्ध नागरिकांना जुनी ओळख असल्याचे भासवून फसवणूक करुन त्यांना लुटणाऱ्या 13 जणांच्या टोळीला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. बँकेत येणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना बोलण्यात गुंतवून, नोटांसारख्या दिसणाऱ्या कागदाचे बंडल देऊन, त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम काढुन घेऊन पसार होणे, तसेच काहींना धार्मिक बोलण्यात गुंतवून त्यांचे दागिने काढण्यास सांगून नंतर पन्नास पावल मागे न वळता पुढे चालत जाण्यास सांगून पळून जाणे, अशा प्रकारचे गुन्हे बऱ्याच प्रमाणे वाढल्याने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ .डी .एस .स्वामी यांच्या नेतृत्वाखाली चार पोलीस पथके स्थापन करण्यात आली होती.
या चारी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे
1)राजू क्रुष्णा शेट्टी (अँटोप हिल मुंबई)
2) रमेशकुमार विजयकुमार जैस्वाल (मुंबई)
3) विलास रामू दळवी (उल्हासनगर)
4) दिनेश भीमराव सुराडकर (उल्हासनगर)
5) संजय महांगडे (मुंबई)
6) मोहम्मद आसीम मोहम्मद रफीक (आंबिवली)
7) गणेश दत्तू ढोले (मुंबई)
8)शारबोन नवलु इस्लाम (मुंब्रा)
9) शंकर उर्फ मरीअप्पन मुरगेशन (डोंबिवली)
10) प्रदीप साहेबराव पाटील (म्हारळ कल्याण)
11) क्रुष्णकुमार श्यामराज सिंग (मुलुंड)
12) अर्जुन अमृतभाई सलाट (गुजरात)
13) अर्जुनभाई दनाभाई मारवाडी (गुजरात)
या 13 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून ठाणे नगर पोलीस स्टेशन येथील 12 गुन्हे, कळवा पोलीस ठाणे येथील 5 गुन्हे, नौपाडा पोलीस ठाणे येथील 14 गुन्हे, राबोडी पोलीस ठाणे येथील एक गुन्हा असे एकूण 40 गुन्हे उघडकीस आणले आहेत. शिवाय, 661 ग्रॅम सोन्याचे दागिने, 30 हजार रुपये रोख रक्कम आणि 20,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यातील सात आरोपी न्यायालयीन कोठडीत असून सहा आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.