ठाणेकरांना सुखद श्रावणसरींचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:26 AM2019-08-03T00:26:04+5:302019-08-03T00:26:39+5:30
जिल्ह्यात पावसाची सरासरी ९१.८३ : भिवंडीत १०५ टक्के पाऊस
ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग
ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. शुक्रवारीही जिल्ह्यात श्रावणसरी कोसळल्या. काही काळ पाऊस पडल्यानंतर पुन्हा ऊन पडत असल्याचा अनुभव ठाणेकरांना मिळत आहे. यादरम्यान कल्याणच्या म्हारळगावात एक घर पडले, तर ठाणे शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २८७ मिमी पाऊस पडला आहे. जिल्हा प्रशासनाकडून सरासरी ४१ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९१.८३ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामध्ये साधारणपणे १५ हजार ७४९.३२ मिमी पाऊस पडल्याची नोंद असून सरासरी दोन हजार २४९.९० मिमी पाऊस जिल्ह्यात पडला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात १०४.७७ टक्के पडला असून याखालोखाल ठाणे शहर परिसरात ९७.४९ टक्के, तर कल्याणला ९२.३५, उल्हासनगरला ९५.७२, मुरबाडला ८०.४३, अंबरनाथला ८८.७० आणि ८३ टक्के पाऊस जिल्ह्यात पडला आहे.
ठाणे : रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शहरात दिवसभर जोरदार बॅटिंग केल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे शहरातील काही सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. तर, वाढत्या पावसामुळे शहराच्या विविध भागांत त्याचा वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.
ठाणे शहरात मागील आठ तासांत ४३.६९ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानुसार, शहरात आतापर्यंत २२४४.८५ मिमी पाऊस शहरात झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत २६७४.६५ मिमी पावसाची नोंद झाली होती. सकाळी पावसाने अधूनमधून जोरदार बॅटिंग केल्याचे दिसून आले. तर, दुपारी काही वेळ पावसाने उसंत घेतली. मात्र, सायंकाळी पुन्हा पावसाने आपला रंग दाखवला. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. शहरातील विविध भागांत कोसळणाºया पावसामुळे आणि रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याचे दिसून आले. तर, शहरात दिवसभरात सात ठिकाणी वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या. तर, दोन ठिकाणी वृक्षाच्या फांद्या पडल्या होत्या. तर, पाच ठिकाणी वृक्ष धोकादायक स्थितीत आले होते. तर, एक ठिकाणी संरक्षक भिंत आणि अन्य एका ठिकाणी नाल्याची भिंत पडल्याची घटना घडली. तर शहरातील नेहमीच्याच सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. मागील आठवड्यातही पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने शहर जलमय झाले होते.