ठाणे शासकीय रुग्णालयाचे स्थलांतर अद्याप अधांतरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 06:47 AM2018-09-27T06:47:53+5:302018-09-27T06:48:03+5:30
जीर्ण झालेल्या पाच इमारती पाडण्याबरोबरच सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याबाबत शासनाने वेगवेगळे दोन जीआर काढल्यानंतर आता पुन्हा ठाणे जिल्हा (सामान्य) रुग्णालयाचे स्थलांतर करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव दिनेश जैन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
- पंकज रोडेकर
ठाणे - जीर्ण झालेल्या पाच इमारती पाडण्याबरोबरच सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याबाबत शासनाने वेगवेगळे दोन जीआर काढल्यानंतर आता पुन्हा ठाणे जिल्हा (सामान्य) रुग्णालयाचे स्थलांतर करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव दिनेश जैन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती रुग्णालयाच्या तातडीने स्थलांतरासाठी शहरात अन्यत्र इमारत उपलब्ध करण्यासाठी पाहणी करून पर्यायी व्यवस्था तसेच सध्या ज्या ठिकाणी रुग्णालय सुरू आहे, त्याच्या सुरक्षिततेचा अभ्यास करून रुग्णालयाचे कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी उपाययोजना सुचवण्याबाबत एक महिन्यात अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे रुग्णालयाचे स्थलांतर अधांतरी होऊन बसले आहे.
९ मार्च २०१८ ला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील ए, बी, सी, डी आणि ई या पाच जुन्या झालेल्या इमारती पाडण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली. त्यानंतर, १७ जुलै २०१८ रोजी सामान्य रुग्णालयात ६७ वाढीव बेडसह १४० बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याबाबत शासनाने दुसरा जीआर काढला. परंतु, पहिल्या जीआरमध्ये राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाच्या इमारतीत जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर करताना केंद्र शासनाकडून याबाबतची परवानगी प्राप्त झाल्यानंतर रुग्णालय स्थलांतर करावे, असे म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही नमूद केले आहे. मात्र, अद्यापही केंद्र सरकारकडून त्याबाबत परवानगी मिळालेली नाही. तसेच जरी परवानगी मिळाली, तरी त्या रुग्णालयातील अंतर्गत डागडुजीच्या कामासाठी काही महिने जातील, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यातच, रुग्णालय प्रशासनाकडून शहरातील काही पर्यायी जागांचे प्रस्ताव पुढे आले होते. त्यातील साकेत आणि कशीश पार्क येथील महापालिकेच्या इमारती रुग्णालय स्थलांतरासाठी पुरेशा आणि सुसज्ज होत्या. त्यातील कशीश पार्क मधील महापालिकेची इमारत जवळपास निश्चित झाली होती. ही जागा पाहण्यासाठी मुख्य सचिव येणार होते. मात्र, त्यांचा दौरा अचानक काही तासांवर आल्यानंतर रद्द झाला. त्यामुळे स्थलांतराचा मुद्दा बारगळला. त्यातच, पुन्हा मंगळवारी रुग्णालयाचे स्थलांतर करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती महिनाभरानंतर देणार असलेल्या त्या अहवालावर स्थलांतर करण्याबाबतचा अंतिम निर्णय शासनदरबारी मान्यतेने घेण्यात येईल, असे म्हटले आहे.
समितीमध्ये सहा सदस्यांचा समावेश
मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीत सहा सदस्य असणार आहेत. त्यामध्ये प्रधान सचिव (सार्वजनिक आरोग्य), ठामपा आयुक्त, मुंबई आरोग्य सेवा संचालनालय आयुक्त तथा अभियान संचालक, मुंबई आरोग्य सेवा संचालनालय संचालक, ठाणे जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे संबंधित सहसचिव या सहा सदस्यांचा समावेश आहे.