Thane: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध, एकनाथ शिंदेंनी दिले स्पष्ट संकेत
By अजित मांडके | Published: September 7, 2023 04:29 PM2023-09-07T16:29:44+5:302023-09-07T16:30:12+5:30
Maratha Reservation : सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दाखविलेल्या आहेत. त्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून काम केले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबध्द आहे.
- अजित मांडके
ठाणे - सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दाखविलेल्या आहेत. त्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून काम केले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबध्द आहे. परंतु हे आरक्षण देत असतांना इतर समाजाच्या आरक्षाणाला कुठेही धक्का लावला जाणार नसल्याचा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दिघे साहेबांच्या हंडीला शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस होते, त्यावेळी त्यांनी आरक्षण दिले होते. ते आरक्षण उच्च न्यायालयाने देखील अंतिम केले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टा ते रद्द झाले असल्याचा दावा त्यांनी केला. परंतु आता ते राजकारण करीत असल्याचेही ते म्हणाले. उध्दव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे हे राज्याचा दौरा करीत असून निष्ठेची भाषा करीत असल्याबाब त्यांना छेडले असता, त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपली निष्ठा विकली, त्यातही बाळासाहेबांचे विचार विकणाºयांनी निष्ठाचे भाषा आम्हाला शिकवू नये असा इशाराही त्यांनी दिला. सनातन धर्माला आजही अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे कितीही स्टॅलीन किंवा इतर कोणी आले तरी सनातन धर्माला धक्का लागू शकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दहीहांडीच्या निमित्ताने गोंविदा थर लावत आहेत, दुसरीकडे राज्यातही सरकार विकासाचे थर लावत असल्याचे त्यांनी सांगितले. आता अहंकाराचे थर कोसळले असून विकासाचे थर रचले जात असल्याचेही ते म्हणाले. देशात राज्यात मोदी यांच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येत असले तरी त्याचा काहीही परिणाम मोदींवर होणार नसून २०२४ ची लोकसभेची हंडी हे मोदीच फोडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हंडीला वरून राजाही प्रसन्न झाला आहे. मुंबईत तसेच ठाण्यात गोविंदाचा उत्साह शिगेला पोचला असून , खरं म्हणजे ठाणे हे गोविंदाचे पांढरी असल्याचे त्यांनी सांगितले. धर्मवीर आनंद दिघें यांनी हा उत्सव सुरु केला आणि संपूर्ण महाराष्ट्रात उत्सव साजरा करू लागले , आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो, त्यामुळे आपण राज्यात चांगले काम करत आहोत, कोरोना काळात लावण्यात आलेली सर्व नियम, बंधने काढून टाकली , गणपती उत्सवावरील वरील सर्व बंधने काढून टाकली , यावर्षी आणखी जोरदार उत्सव साजरे करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली, थर लावताना प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे, सरकारने यावेळी प्रो गोविंदा घेऊन साहसी खेळात याचा समावेश आहे, गोविंदाची सुट्टी पण जाहीर केली, १० लाखांचा विमा देखील काढला, त्यामुळे सांघिक भावनेने उत्सव साजरा करून या उत्सवाला गालबोट लागला काम नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.