ठाणे ‘गुणीजन’ पुरस्कार वादात, नगरसेवकांनी रेटल्या नको त्यांच्या शिफारशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:46 AM2017-10-04T01:46:23+5:302017-10-04T01:46:37+5:30
मागील वर्षी वादादीत ठरलेल्या ठाणे महापालिकेचा वर्धापन यंदाही वादग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ठाणे भूषण, गौरव, गुणीजन अशा पुरस्कारांची खिरापतच वाटण्यात आली होती...
ठाणे : मागील वर्षी वादादीत ठरलेल्या ठाणे महापालिकेचा वर्धापन यंदाही वादग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ठाणे भूषण, गौरव, गुणीजन अशा पुरस्कारांची खिरापतच वाटण्यात आली होती. यामध्ये अनेक नगररेसवकांनी आपल्या कार्यकर्त्यांची शिफारस केल्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यामुळे यंदा अशा पुरस्कारांची खिरापत कमी करण्याचा निर्णय महापौर मीनाक्षी शिंदे यांनी घेतला आहे. परंतु,असे असतांनादेखील अनेक नगरसेवकांनी जे लायक नाहीत, अशांना पुरस्कार मिळावेत म्हणून शिफारसी केल्या आहेत. त्यामुळे यंदाही पालिकेचा वर्धापन दिन या पुरस्कारांच्या निमित्ताने वादात सापडला आहे.
महापालिकेचा ३५ वा वर्धापन दिन सोहळा बुधवारी गडकरी रंगायतन येथे पार पडणार आहे. परंतु, यंदा पुन्हा पालिकेकडून दिल्या पुरस्काराच्या मुद्यावरून हा वर्धापन दिनात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. महापौर कार्यालयाकडे पुरस्कारासाठी लेखी शिफारशींचा खच पडू लागला आहे. यामध्ये नगरसेवकांनी शिफारस केलेल्या इच्छुकांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या एका नव्या दमाच्या नगरसेवकाने आपल्या पित्याला ठाणे भूषण पुरस्कार मिळावा म्हणून स्वत:च शिफारस केल्याचे पत्र महापौरांना दिले आहे.
याशिवाय इतर गोंधळ आहे तो आहेच. मागील तीन दिवसांपासून अशा प्रकारे महापौर कार्यालयात शिफारशींचा पाऊस पडत आहे. परंतु, त्यांना नियमावली मात्र काहीच नाही. ज्या व्यक्तींची शिफारस केली जात आहे. त्या व्यक्तीची कोणतीही परिपूर्ण माहिती अथवा बायोडाटा मात्र जमा केला जात नाही. त्यामुळे एकूणच ठाणे गुणीजन पुरस्कार हे वादात सापडले आहेत. आपल्या कार्यकर्त्याचे समाधान व्हावे म्हणूनही काही नगरसेवकांनी या शिफारशी केल्याचे दिसत आहे.
मागील वर्षी तर सुमारे ३०० हून अधिक जणांना अशा प्रकारे ठाणे गौरव आणि ठाणे गुणीजन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. शिफारस देण्याची शेवटची तारीख उलटून गेली असतांनाही अगदी कार्यक्रम सुरू होण्याच्या वेळेआधीदेखील शिफारसी दिल्या जात असल्याचा मुद्दा मागील वर्षी चांगलाच गाजला होता. प्रत्यक्षात ठाणे भूषण, गौरव, विशेष आणि गुणीजन हे मानाचे पुरस्कार समजले जात आहेत. त्यामुळे ते देतांना त्यांची संख्या किती असावी, याची मर्यादा असणे गरजेचे आहे.
पुरस्कार देतांना त्या व्यक्तीचे कार्य पाहणे आणि यासाठी एका ज्युरी टीमची नेमणूक होणे महत्त्वाचे आहे. परंतु,असे काहीही घडत नसून या पुरस्कारांचा अवमान करण्याचे काम राजकीय मंडळींकडून केले जात आहे. त्यामुळे याला पायबंद घालण्याची गरज आता निर्माण झाली असून तशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
एकीकडे नको त्या मंडळींची शिफारस केली जात असतांना आणि जे या पुरस्कारांसाठी पात्र नसतांना अशांना हे पुरस्कार दिले जात आहेत. तर दुसरीकडे जे खरोखर या पुरस्कारासाठी पात्र अशांना मात्र डावलले जात असल्याची खंत व्यक्त होत आहे. ठाण्यातील लीला श्रोती यांना ठाणे भूषण अथवा गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकाने शिफारस पत्र दिले आहे. विशेष म्हणजे यामध्ये श्रोती यांनी केलेले संपूर्ण कार्यदेखील त्यांनी विषद केले आहे. श्रोती या शिक्षिका असून वयाच्या ९० व्या वर्षीदेखील बाह्यपरिक्षांची भुमिका बजावत असून त्यांच्या तालमीत संस्कृतमध्ये अनेकांनी प्रतितयश संपादन केले आहे. काही संस्थांनीदेखील त्यांचा नुकताच गौरव केला आहे. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षिकेला मात्र वादादीत ठरत असलेला आणि खिरापत म्हणून वाटप केला जात असलेला ठाणे गुणीजन पुरस्कार देऊन बोळवण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.