केंद्रासह राज्यापेक्षा ठाण्यात मृत्यूदर कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 12:15 AM2020-06-02T00:15:29+5:302020-06-02T00:15:39+5:30
विजय सिंघल यांचा दावा : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४६ टक्क्यांवर
ठाणे : ठाण्यात विशेषकरून झोपडपट्टीत कोरोनाचे रुग्ण वाढत असून ते बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण हे ४६ टक्क्यांवर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्र आणि राज्याच्या तुलनेत ठाण्यात मृत्यूचे प्रमाणही कमी असल्याचा दावा महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सोमवारी केला. ठाणेकरांशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना त्यांनी हा दावा केला. याप्रसंगी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिका करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
कोरोनाबाबतचे नियम शिथिल करीत असताना नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून गरज असेल तरच बाहेर पडावे, ५० वर्षे वयोगटातील नागरिकांनी आणि १० वर्षांच्या आतील मुलांनी घरीच राहावे, असे आवाहनही केले. कामावर जाताना ताप आहे किंवा नाही, आॅक्सिजनचे प्रमाण किती आहे, हे तपासूनच घराबाहेर पडावे. खरेदी किंवा मॉर्निंगवॉकसाठी फिरताना तीन फुटांचे अंतर ठेवून मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करावा. ठाणेकरांची साथ लाभली तर १५ दिवसांत कोरोना आटोक्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठाण्यात ५० फिव्हर क्लिनिक सुरू
शहरात ८८ अॅम्ब्युलन्स उपलब्ध असून काही दिवसांत १०० हून अधिक उपलब्ध होतील. शहरातील कोरोना रुग्णालयांमध्ये किती बेड शिल्लक आहेत, याची माहितीही आता एका क्लिकवर उपलब्ध असून झोपडपट्टी भागात ५० फिव्हर क्लिनिक सुरू करून एक हजार जणांची टीम ही घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याचे काम करीत आहे. आता ती कंटेनमेंट झोनमध्येही जाऊन काम करणार आहे.
कोरोना रुग्णांसाठी आठ हजार बेडची सोय
कोरोनाबाधितांसाठी ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे एक हजार बेडच्या रुग्णालयाचे काम सुरू असून म्हाडाही हजार बेडचे रुग्णालय उभे करणार आहे. सद्य:स्थितीत शहरात आठ हजार बेड उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. घरोघरी जाऊन अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटपही सुरू आहे. ठाण्यात नियम शिथिल करीत असलो तरी खरबदारी म्हणून रस्त्याच्या डाव्या बाजूची एका दिवशी आणि रस्त्याच्या उजव्या बाजूची एका दिवशी अशी आलटूनपालटून दुकाने उघडी ठेवून झोपडपट्टी भागात ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.
नालेसफाई योग्य पद्धतीने
येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून नाल्यांची सफाई योग्य पद्धतीने सुरू आहे. आपत्तीचा सामना करण्यासाठीदेखील महापालिका सज्ज आहे.