परवडणाऱ्या घरांसाठी ठाणेच 'नंबर वन'; २०१९ पासून नोंदणीत २२ टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 08:25 AM2022-02-20T08:25:17+5:302022-02-20T08:25:40+5:30
आलिशान घरात मध्य मुंबईची आघाडी
सचिन लुंगसे
मुंबई : २०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये परवडणाऱ्या घरांच्या (१ कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या) नोंदणीमध्ये २२ टक्के वाढ झाली. या विभागात २०२१ मध्ये एकूण विक्रीच्या ३९ टक्के विक्री झाली. यातील सर्वाधिक घरे ठाण्यात तर दुसरा क्रमांक हा पश्चिम उपनगरातील दूरच्या भागातील आहे, अशी माहिती ‘एमएमआर हाऊसिंग अपटिक एडेड बाय सपोर्ट’ या संशोधनात्मक अहवालातून समोर आली आहे.
८१ टक्के स्टॅम्प ड्यूटी जमा
- एमएमआर क्षेत्रात २०२१ मध्ये घरांच्या विक्रीत वाढ झाली असून, ती २०१९ च्या तुलनेत ८१ टक्के स्टॅम्प ड्यूटी जमा झाली.
- ११ हजार कोटींहून अधिक रुपये मुंबई महापालिकडे डिसेंबर २०२१ पर्यंत प्रीमियम जमा करण्यात आले. गेल्या १० वर्षांची सरासरी जमा ही जवळजवळ ३५००-४००० कोटींच्या आसपास असे, यात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.
- २०२०-२१ या आर्थिक वर्षांत मालमत्ता करांची वसुली ही १० वर्षांतील सर्वाधिक अशी होऊन ती ५१३५ कोटी रुपये झाली, म्हणजेच अपेक्षेच्या ९८ टक्के होती. जीएसटी खालोखाल महानगरपालिकेला मालमत्ता करातून सर्वाधिक उत्पन्न मिळते.
आलिशान घरात मध्य मुंबईची आघाडी
अनेक वर्षांनंतर पुन्हा आलिशान घरांची मागणी वाढू लागली आहे. या विभागात (तीन कोटींपेक्षा अधिक किमतीची घरे) २०२१ मध्ये २०१९ च्या तुलनेत मागणीत जवळजवळ दुप्पट वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक विक्री ही लक्झरी विक्रीत दिसून आली. २०२१ च्या विक्रीतील ही टक्केवारी २८ टक्के होती. यात विक्री ही मध्य मुंबईत झाली त्याखालोखाल पश्चिम उपनगराने बाजी मारली.