ठाण्यात जीवावरचे वृक्षांवर निभावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 06:00 AM2020-06-04T06:00:44+5:302020-06-04T06:00:52+5:30

७० पेक्षा अधिक वृक्ष कोसळले; १२ घरांचे नुकसान, मुंब्रा येथे एक जखमी

In Thane, he survived on trees | ठाण्यात जीवावरचे वृक्षांवर निभावले

ठाण्यात जीवावरचे वृक्षांवर निभावले

googlenewsNext

जितेंद्र कालेकर, अनिकेत घमंडी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोकण किनारपट्टीवर धडकलेले निसर्ग चक्रीवादळ ठाणे जिल्ह्यात पोहोचले तोपर्यंत त्याची तीव्रता बरीच कमी झालेली असल्याने जीवितहानी टळली. वादळी वारे व झाडे, भिंत कोसळल्यामुळे शहापूर, भिवंडी, मुरबाड येथील १० ते १२ घरांचे नुकसान झाले. ठाणे शहरासह जिल्ह्यात ७० पेक्षा अधिक मोठे वृक्ष उन्मळून पडले. मुंब्रा खडी मशीन रोड भागात एका बंगल्याची भिंत बुधवारी दुपारी बाजूच्या घरावर कोसळली. यात मंजूर जावळे (५५) जखमी झाले. सुदैवाने यात मोठी हानी झाली नाही.
दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास निसर्ग वादळाचे नवी मुंबईतून ठाणे जिल्ह्यात आगमन झाले. डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ तालुक्यापासून सर्वच ठिकाणी थोड्या फार प्रमाणात वादळाचा प्रभाव जाणवला. वादळी वाऱ्यामुळे नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, शहापूर आणि अंबरनाथ या भागांमध्ये अनेक जुने वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. घरांचे पत्रे उडाल्याच्याही घटना घडल्या. कुळगाव बदलापूरात १४ ठिकाणी, अंबरनाथमध्ये १५, उल्हासनगरमध्ये १० तर भिवंडीत सहा वृक्ष पडले.
तीन हजार नागरिकांचे स्थलांतर
खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हयातील ४३० ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा दिला होता. बुधवारी दिवसभर शहर तसेच ग्रामीण भागात दवंडी पिटवून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. ठाणे पालिकेनेही एनडीआरफची टीम तैनात ठेवली.
खाडी किनारी असलेल्या मीरा भार्इंदरच्या एक हजार ७००, शहापूरच्या एक हजार ६७ अशा तीन हजार ९० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले होते.वादळाची कमी झालेली तीव्रता यामुळे सुदैवाने मोठी हानी झाली नसल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाणे जिल्हा आपत्कालीन कक्ष, तसेच ठाणे पालिका आपत्कालीन कक्ष येथे भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची तीन, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची तीन पथके मीरा-भार्इंदर, शहापूर, नवी मुंबईत तैनात केली होती.
सखल भागात पाणी
कल्याणमध्ये चिराग हॉटेल भागात पाणी साचले होते. ठाण्यातील कळवा भागातील नवशक्ती चाळीत पाणी साचले होते. त्यामुळे तेथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. शहापूरातील दरिहगाव, मुरबाडमधील सोनावडे आणि वालीवडे तसेच भिवंडीतील एका घराचे नुकसान झाले.

Web Title: In Thane, he survived on trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.