Thane: वाहतुकीच्या नियमांची होळी, आठ हजार चालकांवर कारवाई, तीन दिवसांत वाहतूक पोलिसांची मोहीम
By जितेंद्र कालेकर | Published: March 27, 2024 08:19 PM2024-03-27T20:19:06+5:302024-03-27T20:19:30+5:30
Thane News: होळी, धुळवडीच्या नावाखाली वाहतुकीच्या नियमांना तिलांजली देत वाहन चालविणाऱ्या आठ हजार ३१९ चालकांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - होळी, धुळवडीच्या नावाखाली वाहतुकीच्या नियमांना तिलांजली देत वाहन चालविणाऱ्या आठ हजार ३१९ चालकांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. मद्य प्राशन करून वाहन चालविणारे, भन्नाट वेग, विना हेल्मेट, ट्रिपल सीट आणि रिक्षांमध्ये फ्रंट सीट प्रवासी नेणाऱ्या चालकांवर २२ ते २५ मार्च या चार दिवसांत कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेने बुधवारी दिली.
सण, उत्सवाच्या काळात रस्त्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी संपूर्ण पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात नाकाबंदी लावून मोठा बंदोबस्त तैनात केला होता. होळी, धुलिवंदनाच्या काळात अनेक चालक मद्य प्राशन करून वाहन चालवितात. यातून अनेकवेळा अपघात होऊन चालक, तसेच प्रवाशांचा मृत्यू ओढवतो. काहीजण कायमचे जायबंदी होतात. त्यामुळे या दिवसात पोलिसांनी सतर्क राहून हुल्लडबाजी आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या चालकांवर कारवाई केली.
पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या चार विभागांत वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी चौकात, तसेच नाक्यांवर कुमक तैनात केली होती. वाहतूक पोलिसांच्या १८ युनिटमार्फत ४० ब्रीथ ॲनलायझरद्वारे मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. याशिवाय, २२ ते २५ मार्च २४ या चार दिवसांत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आठ हजार ३१९ चालकांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली. यामध्ये २५ मार्चला धुळवडीच्या दिवशी तब्बल तीन हजार चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
आयुक्तालयात अशी झाली कारवाई
मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ३८२ चालकांवर कारवाई झाली आहे, तर दुचाकीवर ट्रीपल सीट जाणाऱ्या एक हजार ८६ चालकांसह विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या पाच हजार ११७ चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रिक्षामध्ये चालकांच्या बाजूच्या फ्रंट सीटवर प्रवासी नेणाऱ्या एक हजार ७३४ चालकांवर कारवाई केली आहे.
सण, उत्सवासह सर्वच दिवसांमध्ये वाहतूक पोलिस रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावतात. उत्साहाच्या भरात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेण्यासाठी नाकाबंदी केली होती. दंडाची कारवाई आणि अपघात टाळण्यासाठी चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे.
- डॉ. विनय राठोड, पोलिस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर.