ठाण्यातील घटना: तरुणीच्या असभ्य वर्तनामुळे अभिनेत्री जुई गडकरीला मनस्ताप
By जितेंद्र कालेकर | Published: August 2, 2018 09:40 PM2018-08-02T21:40:04+5:302018-08-02T22:11:21+5:30
ठाण्यातील एका तरुणीने अत्यंत अर्वाच्य शिवीगाळ करून असभ्य वर्तणूक केल्याने अभिनेत्री जुई गडकरी हिने मनस्ताप व्यक्त केला. यासंदर्भात बुधवारी सायंकाळी फेसबुकवर पोस्ट टाकून तिने आपली ही उद्विग्नता स्पष्ट केली.
ठाणे : बाळकुम भागातील एका तरुणीने अत्यंत हीन शब्दांत शिवीगाळ करून असभ्य वर्तणूक केल्याने अभिनेत्री जुई गडकरी हिने मनस्ताप व्यक्त केला. यासंदर्भात बुधवारी सायंकाळी फेसबुकवर पोस्ट टाकून तिने आपली उद्विग्नता व्यक्त केली.
देवाचे माझ्यावर इतके प्रेम आहे की, त्याने मला सगळेच अनुभव द्यायचे असे ठरवले, अशी सुरुवात केलेल्या या पोस्टमध्ये जुईने ठाण्यातील हा अनुभव कथन केला आहे. एका महत्त्वाच्या कामासाठी जायचे असल्यामुळे तिने एक टॅक्सी केली. त्याचवेळी बाळकुम भागातून २२ ते २५ वयोगटांतील एक तरुणी तिच्या आईसह तिच्या टॅक्सीजवळून स्कूटरवरून गेली. तिचा तोल गेल्याने ती टॅक्सीच्या अगदी जवळ आली आणि नंतर ती थोडी दूर गेली. त्याचवेळी अवघ्या काही वेळातच तिने अत्यंत अर्वाच्य शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विनाहेल्मेट असलेल्या या तरुणीने नाहक या टॅक्सीचालकाला शिवीगाळ केली. पुढे उड्डाणपुलाकडे तिची गाडी आल्यानंतर तिने जुईच्या टॅक्सीला तिची स्कूटर आडवी लावली. त्यावेळी तिच्या आईने या कारचालकाच्या श्रीमुखात लगावली. तिथे तिची मुलगीही आली आणि तिने पुन्हा शिव्यांची लाखोली वाहण्यास सुरुवात केली. तेव्हा अर्जंट जायचे असल्यामुळे तुम्ही गाडी सोडा, अशी जुईने विनवणी केली. त्यावर तू गप्प बस नाही, तर तुलाही कानाखाली लावीन, असा दम द्यायलाही या तरुणीने मागेपुढे पाहिले नाही. ही कुठली भाषा, असा सवाल तिने केल्यानंतर आपण आगरी असल्याचा दावा तिने केल्याचे जुईने म्हटले आहे. नंतर, टॅक्सीचालक चुकला असेल, तूही विनाहेल्मेट आहेस, वगैरे सांगण्याचा जुईने प्रयत्न केला. बऱ्याच बाचाबाचीनंतर तिची गाडी सोडण्यात आली. जाताना आईने सुनावले की, आम्हाला ठोकले असते तर...
मुळात स्वत:ची चूक असताना दुस-याला शिवीगाळ करणे, शिवाय आपला यात थेट संबंध नसतानाही या मुलीने आपला नाहक उद्धार करणे, याबद्दल तिने उद्विग्नता व्यक्त केली. आपल्या जीवाची इतकीच पर्वा होती, तर तिनेही हेल्मेट घालणे आवश्यक होते, असेही यात तिने सुचवले आहे. याप्रकरणी कोठेही तक्रार दाखल नसल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.