ठाण्यातील आगीच्या घटनांत घट

By admin | Published: November 24, 2015 01:47 AM2015-11-24T01:47:49+5:302015-11-24T01:47:49+5:30

ठाणे महापालिका हद्दीत दिवाळीच्या चार दिवसांत विविध ठिकाणी ३३ आगीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र झाली आहे.

Thane incident in fire | ठाण्यातील आगीच्या घटनांत घट

ठाण्यातील आगीच्या घटनांत घट

Next

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत दिवाळीच्या चार दिवसांत विविध ठिकाणी ३३ आगीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत यंदा आगीच्या ३०२ घटना घडल्या आहेत. मागील वर्षी हेच प्रमाण ३१७ एवढे होते. परंतु, पालिका आणि
अग्निशमन विभागाने केलेल्या विविध उपायांमुळे का होईना यंदा आग लागण्याच्या प्रमाणात काही अंशी घट झाली आहे.
सहा वर्षांपूर्वी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वर्तकनगर येथील तारांगण सोसायटीमधील पुनर्वसू या इमारत क्रमांक १० मधील १४ व्या मजल्याला लागलेल्या आगीत अग्निशमन विभागाचे सहा जवान शहीद झाले होते. त्यानंतर, ठाणे महापालिका खडबडून जागी झाली होती. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच जनजागृती आणि मॉकड्रीलच्या माध्यमातून अग्निशमन विभागाने ठाणेकरांना जागरूक करण्याचे काम केले आहे.
यंदा दिवाळीच्या काळात एखादी आगीची घटना घडली तरी त्यासाठी सात ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात अग्निशमन केंद्र उभारले होते. यंदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १० नोव्हेंबरला शहरात आगीची केवळ एकच घटना घडली. तर, दुसऱ्या दिवशी १६ ठिकाणी आगीच्या
घटना घडल्या होत्या. तिसऱ्या
दिवशी ९ आणि चौथ्या दिवशी ५ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीत शहरात आगीच्या ३१७ घटना घडल्या होत्या. तर, यंदा याच कालावधीत ३०२ घटना घडल्या आहेत. यासंदर्भात अग्निशमन विभागाशी संपर्क साधला असता आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाय, जनजागृतीचे कार्यक्रम, मॉकड्रील आणि त्यामध्येही नागरिकांचा
सहभाग, याशिवाय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी केले जात असलेले
प्रशिक्षण आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यामार्फत
वारंवार केले जात असलेले मार्गदर्शन यामुळे शहरात यंदा आगीच्या घटनांवर आळा बसविण्यात यश आल्याचा दावा अग्निशमन विभागाचे प्रमुख अरविंद मांडके यांनी केला आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Thane incident in fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.